Gujarat Assembly Election 2022 : शशी थरूर यांचा गुजरातमध्ये प्रचारास नकार, समोर आलं ‘हे’ कारण….

नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश नसल्याने ज्येष्ठ नेते शशी थरूर नाराज असल्याचे सूचित होत आहे. त्यातून त्यांनी चक्क गुजरातमध्ये प्रचार करण्यास नकार दिल्याचे समजते.
कॉंग्रेसची विद्यार्थी संघटना असणाऱ्या एनएसयूआयने थरूर यांना गुजरातमधील एका कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. मात्र, पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश नसल्याने थरूर यांनी ते निमंत्रण स्वीकारले नाही. त्या पार्श्वभूमीवर, स्टार प्रचारक बनवण्यात न आल्याने नाराज आहात का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.
कॉंग्रेसला आपल्यासाठी कोण आणि काय सर्वोत्तम आहे ते ठाऊक आहे. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर थरूर यांनी दिले. नाराज असल्याचे कबूल करणे त्यांनी टाळले; पण त्यांचे त्रोटक उत्तर त्यांची नाराजी सूचित करणारे ठरले.
दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने नुकतीच स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, काँग्रेस अध्यक्ष व गांधी कुटुंबासह देशभरातील प्रमुख नेत्यांचा या यादीत समावेश आहे.
एकूण 40 प्रचारकांच्या या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तिसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग व कमलनाथ, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा प्रामुख्याने समावेश आहे. महाराष्ट्रातून चव्हाण यांच्या व्यतिरिक्त माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नसिम खान व रामकिशन ओझा यांचा या यादीत समावेश आहे.




