बस चालवताना ड्रायव्हरचं रील बनवणं प्रवाशांच्या जीवावर बेतलं ; भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

Gujarat accident । गुजरातमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अंबाजी याठिकाणी भीषण रस्ता अपघात ल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर 35 हून अधिक जण जखमी झाले. 5 ते 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते.
अंबाजीतील त्रिशूलीया घाटात बसचे नियंत्रण सुटून दरीतील रेलिंगला धडकून बस उलटून अपघात झाला. जखमींना पालनपूर आणि अंबाजी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मते, घाटावर बसमध्ये चढत असताना ड्रायव्हर मोबाईलने रील काढत होता. आम्ही त्याला मनाई केली होती तरीही तो रील बनवण्यात व्यस्त राहिला. दरम्यान, घाटावरील हनुमान मंदिराजवळ रेलिंगला धडकल्याने बस पलटी झाली. चालक घटनास्थळावरून फरार झाला होता.
चालक मद्यधुंद असण्याचीही शक्यता Gujarat accident ।
दरम्यान, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे काही प्रवाशांचे म्हणणे आहे. यामुळे अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्याला लवकर पकडले आणि त्याची वैद्यकीय चाचणी केली तर संपूर्ण सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. बसमध्ये प्रवास करणारे सर्व जण अंबाजी मंदिराचे दर्शन घेऊन दांता शहरात परतत होते. अपघाताची माहिती मिळताच जखमींना मदत करण्यासाठी लोक जवळच्या गावात पोहोचले. लोकांनी जखमींना खासगी वाहनातून अंबाजी रुग्णालयात दाखल केले.
मंदिराच्या वार्षिक कार्यक्रमाला लोक गेले होते Gujarat accident ।
महुधा तालुक्यातील महिसा गावात राहणारे राजेशभाई रोहित म्हणाले की, दरवर्षी नवरात्रीला आमच्या आजूबाजूच्या गावातील लोक अंबाजी मंदिराच्या कार्यक्रमाला जातात. या वेळीही रविवारी (6 ऑक्टोबर) सायंकाळी आमच्या महिसा गावातील 15 आणि कठालाल गावातील सुमारे 20 जण अंबाजी मंदिरात गेले होते. 7 ऑक्टोबरला सकाळी हे सर्व लोक घरी परतत होते. यादरम्यान त्यांचा अपघात झाला.





