येरळवाडी तलाव परिसरात आले पाहुणे

नितीन राऊत
वडूज – खटाव तालुक्यातील येरळवाडी तलावाच्या परिसरात मनाला भुरळ घालणारे स्थलांतरित फ्लेमिंगो पाहुणे पक्षी मुक्कामास आले आहेत. प्रथम मायणी येथील इंदिरा गांधी पक्षी अभयारण्यात व कानकात्रे येथे पक्ष्यांचे वास्तव्य असायचे. त्यामुळे सुरक्षितेला प्राधान्य देत त्यांनी आपले वास्तव्य येरळवाडी मध्यम प्रकल्पावर हलविले आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये येणारे हे परदेशी पाहुणे यावेळी चार महिने अगोदरच दाखल झाले आहेत.
वडूजपासून सात किलोमीटर अंतरावर येरळवाडी आहे. तेथील तलावामधील पाण्याचा मृतसाठा दिसून येत असल्याने सुरक्षित पाणथळ आणि मुबलक अन्नसाठ्यामुळे रोहित पक्षी (फ्लेमिंगो) या परिसराकडे आकर्षित होत आहते. खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी, मायणी तलावात मुबलक पाणीसाठा नसून अन्नसाठा व सुरक्षिततेचा अभाव असल्याने आपसुकच परदेशी पाहुण्यांनी येरळवाडी तलावाला प्राधान्य दिले. तलाव परिसरात पक्ष्यांचा वावर वाढल्याने या पाहुण्यांचे निरीक्षण करण्यासाठी सकाळी व सायंकाळी पक्षीप्रेमींची पावले तलावाकडे वळू लागली आहेत. येरळवाडी मध्यम प्रकल्पात अनेक स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. यामध्ये प्रारंभी फ्लेमिंगो पक्षी विराजमान झाले आहेत. गेल्या वर्षी खटाव तालुक्यावर वरूणराजाची कृपा होती. त्यामुळे येरळवाडी तलाव पूर्ण भरला होता. मात्र, यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे पाणीसाठा अल्प आहे. त्यामुळे परदेशी पाहुण्यांचे येरळवाडी तलावात आगमन झाले आहे. फ्लेमिंगो हा समुद्र पक्षी म्हणून ओळखला जातो.
ध्रुवीय प्रदेशातील बर्फ गोठण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे परदेशी पाहुणे सायबेरिया, चीन, अफगाणिस्तान, रशिया आदी देशांतून भ्रमंती करत राज्याच्या काही भागात येतात. महाराष्ट्रात त्यांचा येण्याचा कालावधी डिसेंबरचा पहिला आठवडा असतो. गुलाबी थंडीमध्ये त्यांचे प्रमाण जादा असते. पण यावेळी त्यांचे आगमन ऑगस्टमध्येच झाले आहे. सध्या तलावात चित्रबलाक, करकोचा, कांडेसर, स्पून बिल, काळा शराटी, पान कावळा, खंड्या, कवड्या, कवड्या तुतारी, शेकाट्या, जांभळी पाणकोंबडी, चक्रवाक, नदीसुरय, सुतारपक्षी, ग्रे हेरॉन, चांदवा, कोतवाल आदी पाहुण्यांनी बहरला आहे. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणांहून पक्षीप्रेमी तलाव परिसरात दाखल होत आहेत. पक्ष्यांच्या हालचाली पाहण्यासाठी सकाळी व सायंकाळी गर्दी होत आहे.
दरम्यान, या सर्वांपेक्षा देखणा फ्लेमिंगो (रोहित, अग्निपंख) या परदेशी पाहुण्याची पक्षीप्रेमीचे आकर्षण आहे. त्याचा रंग पांढरा, गुलाबी किंवा लालसर असून उंची दीड ते दोन मीटर असते. त्याचा लांब गळा, काठीसारखे पाय आणि गुलाबी लालसर पंख, गुलाबी रंगाची चोच तसेच लांब मान हे देखण्या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. तलावात पाणीसाठा असल्याने या पक्ष्यांना खाद्य खाण्यासाठी व बसण्यासाठी सुरक्षित जागा आहे. तर तलाव परिसरात दलदलीच्या भागात फ्लेमिंगो पक्षी मासे कीटक, आटोलियासारख्या वनस्पती शोधत मुक्त विहार करताना दिसत आहेत. त्यांच्या आकर्षक छबीचे क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकार व पक्षीप्रेमी तलावाकडे धाव घेत आहेत.
दरम्यान, दरवर्षी डिसेंबर महिनाअखेर येरळवाडी तलावात फ्लेमिंगो पक्षी येत असतात. पण या वर्षी ऑगस्टमध्येच पक्षी आले आहेत. येरळवाडी येथील शेतकरी व पक्षी मित्र बाळासाहेब पोळ यांच्या घरावरून घिरट्या मारून जाताना रविवार दि. 6 रोजी सांयकाळी फ्लेमिंगो पक्ष्याचा आवाज ऐकावयास मिळाला. त्यांनी तातडीने पक्षी अभ्यासक डॉ. प्रवीण चव्हाण यांच्याशी संपर्क साधला.
फ्लेमिंगो पक्ष्यांनी घातली मोहिनी …
फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन चार महिने अगोदरच झाले. केळीच्या आकाराची चोच असलेल्या फ्लेंमिंगोनी पक्षीप्रेमींना मोहिनी घातली आहे. येरळवाडी तलावात परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पक्षीप्रेमी व फोटोग्राफर दुर्बिण व कॅमेरे घेऊन त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी हजेरी लावू लागले आहेत. त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळू लागली आहे.
यापूर्वी मुंबई परिसरात सुमारे दीड लाख फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले होते. त्यातील 30 टक्के पक्षी स्थायिक झाले. कारण सुरक्षित पाणथळे व मुबलक अन्नपुरवठा असल्याने ते स्थायिक झाले. या पाहुण्यांचे सातत्य टिकविण्यासाठी तलाव परिसरातील जैविक विविधता जोपासणे काळाची गरज आहे.
डॉ. प्रवीण चव्हाण, पक्षी अभ्यासक





