Gudi Padwa 2026 : यंदा गुढीपाडव्याला ‘मिनी गुढी’चा जलवा; पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठेत नवा ट्रेंड..पाहा
Gudi Padwa 2026 : लाल, हिरव्या आणि केशरी रंगांच्या जरीच्या वस्त्रांसह पितळी कलशांनी सजलेली 'मिनी गुढी'; यंदा घरोघरी दिसणार नवा लुक.

Gudi Padwa 2026 – मराठी नववर्षाचा शुभारंभ करणारा गुढीपाडवा सण जवळ येताच पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठांमध्ये सणाची लगबग सुरू झाली आहे. यंदा पारंपरिक गुढीसोबतच छोट्या आकारातील ‘मिनी गुढी’ला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठा विविध रंगांच्या गुढ्यांनी सजल्या आहेत.
चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, भोसरी, निगडी, सांगवी, थेरगाव तसेच परिसरातील मुख्य बाजारपेठांमध्ये लहान आकारातील सजावटीच्या गुढ्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पितळी कलश, रंगीत कापड, जरीच्या लेस, लहान माळा आणि पारंपरिक पूजा साहित्यासह तयार करण्यात आलेल्या या गुढ्या ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
घरातील सजावट, देवघर किंवा मुलांसाठी खास म्हणून या गुढ्या खरेदी केल्या जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात उपलब्ध असलेल्या मिनी गुढ्या विविध रंग, आकार आणि डिझाइनमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. लाल, हिरवा, केशरी, जांभळा आणि पिवळा अशा आकर्षक रंगांच्या गुढ्यांना ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत आहे.
काही गुढ्या चौकोनी किंवा गोल पाटांवर उभारलेल्या असून त्यावर नक्षीकाम केलेले आहे. हलक्या कापडाचा वापर, जरीची सजावट आणि पारंपरिक घटकांमुळे या गुढ्या आकर्षक दिसत आहेत. सध्या मिनी गुढीची किंमत साधारणपणे २५० ते ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. त्यासोबतच गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या लाकडी काठ्यांची विक्रीही जोरात सुरू आहे.
अनेक दुकानदारांनी गुढीसाठी लागणारे कापड, जरी, काठ्या, पितळी कलश, तसेच पूजा साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याने ग्राहकांची सोय होत आहे. गुढीपाडवा जवळ आल्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये विशेष स्टॉल उभारण्यात आले आहेत. विशेषत: महिला वर्गाकडून गुढ्या, कापड आणि सजावटीच्या साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, सणाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत गुढ्या, काठ्या आणि पूजासाहित्याच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये गुढीपाडव्याच्या स्वागताची तयारी रंगात आली आहे.





