पुणे जिल्हा | इंदापुरात 2449.5 हेक्टरवर पेरू बहराला

लोणी देवकर, (वार्ताहर) – खरीप हंगाम व रब्बी हंगामातील पिकातून मिळणार्या उत्पन्नापेक्षा खर्चच जादा होत असल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी पेरू फळ बागेकडे वळाला आहे. 2023-24मध्ये 2449.5 हेक्टरवर पेरूच्या बागा बहरल्या आहेत, अशी माहिती इंदापूर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षा पूर्वी शेतकरी खाण्यासाठी पेरू असावा म्हणून घरासमोर विहिरीच्या बाजूला व काही बांधावरती पेरूची झाडे लावत होता. मात्र अलीकडच्या काळात हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी पेरूच्या फळबागेकडे वळाला असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरूच्या बागा बहरू लागल्या असल्याचे चित्र दिसत आहे.
पेरूची बाग ही हमखास उत्पन्न मिळवून देणा-या बागा झाल्या आहेत. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांना बगल देत शेतकरी पेरू फळ बागेकडे वळाला आहे. पेरू देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेतही जाऊ लागला आहे.
कोणत्याही जमिनीत व हवामानात येणारे पीक असल्यामुळे बरेचसे शेतकरी या पिकाकडे वळल्याचे दिसत आहे. कारण पूर्वी इंदापूर तालुक्यातील शेतकरी द्राक्ष व डाळिंब या बागाकडेच वळाला होता मात्र सतत बदलत असलेल्या वातावरण बदलामुळे बागा जैविक व अजैविक ताणास बळी पडत असल्यामुळे तसेच जागतिक मंदी मुळे सध्या इंदापूर तालुक्यातील शेतकरी बागेकडे वळाला असून तैवान, पिंक, व्ही एन आर व गुजरात रेड या जातीच्या पेरूची लागवड केली जात आहे.
चौकट ळ्: वर्षनिहाय पेरू फळबागेचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
2019- 20 : 356
2020- 21 : 477
2021- 22 : 896
2022- 23 : 1047
2023-24 : 2449.5
70 टक्के पिंक तैवान
तालुक्यातील एकूण पेरू क्षेत्रापैकी 70 टक्के पिंक तैवान, 20 टक्के व्ही एन आर व 10 टक्के गुजरात रेड जातीची लागवड दिसून येत आहे.तालुक्यातील समशीतोष्ण हवामानामुळे उन्हाळी,पावसाळी व हिवाळी हंगाम धरता येतो त्यामुळे तालुक्यातील शेतकरी या पेरूच्या फळबागांकडे वळाला आहे.
पेरू फळामध्ये असणारे क जीवनसत्व हे संत्रा व मोसंबी पेक्षा पाचपट अधिक असल्याचे सिद्ध झाल्यामुळे पेरू खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. भविष्यामध्ये आपल्या भागातील शेतकरी शास्त्रीय ज्ञानाचा अचूक वापर करून उच्च प्रतीचे पेरू उत्पादन घेतील. – राजेंद्र वाघमोडे, संचालक, महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र
खरीप व रब्बी हंगामापेक्षा फळबागा परवडत आहेत कारण रब्बी व खरीप हंगामातील पिकांसाठी लागणारे बी बियाणे, खते, कामासाठी लागणारे मजूर, पाणी आदींचा खर्च काढला तर उत्पन्नापेक्षा खर्च जादा होत आहे.त्यामुळे शाश्वत फळपीक म्हणून शेतकर्यांची पेरूला पसंती दरही चांगला मिळत असल्याने सध्या शेतकरी पेरू फळबागेकडे वळला आहे. – सिद्धेश्वर थोरात, शेतकरी, लोणी देवकर





