जम्मू-काश्मीरमध्ये इव्हीएमवर पहारा; उमेदवारांच्या समर्थकांची स्ट्रॉंग रूम्सवर बारीक नजर

राजौरी : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्या निकालाआधी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (इव्हीएम) सुरक्षिततेचे महत्व वाढले आहे. इव्हीएमच्या विश्वासार्हतेविषयी सातत्याने शंका घेतली जात असल्याने त्यांच्यावर उमेदवारांनी शब्दश: पहारा ठेवला आहे. उमेदवारांचे समर्थक इव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम्सवर बारीक नजर ठेऊन आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 3 टप्प्यांत मतदान झाले. ती प्रक्रिया 1 ऑक्टोबरला पूर्ण झाली. मात्र, हरियाणातील मतदानामुळे जम्मू-काश्मीरच्या निकालासाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरचे निकाल एकाच दिवशी म्हणजे 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये इव्हीएम ठेवण्यात आलेल्या ठिकाणांना त्रिस्तरीय सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या मागदर्शक तत्वांच्या आधारे तसे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, भवितव्य पणाला लागलेल्या उमेदवारांनीही आपली यंत्रणा कामाला लावली आहे. इव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम्सबाहेर उमेदवारांचे समर्थक तळ ठोकून आहेत. त्यांच्यासाठी तंबूंची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. इव्हीएमवर वॉच ठेवण्यामागे उमेदवारांची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या काही चिंता आहेत. जनतेने दिलेल्या कौलाचे रक्षण व्हावे असे आम्हाला वाटते, असे त्यांचे म्हणणे आहे.





