कणकवलीत पालकमंत्री नितेश राणेंची मटका बुकीवर धाड; 11 संशयित ताब्यात

सिंधुदुर्ग : आपल्या आक्रमक आणि हिंदुत्त्ववादी भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असणारे भाजप नेते आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवलीत थेट मटका बुकीच्या अड्ड्यावर धाड टाकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. गेले अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका व्यवसायाचे जाळे पसरवणाऱ्या नामांकित मटका बुकी महादेव रमाकांत घेवारी यांच्या कणकवली येथील अड्ड्यावर आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री राणे यांनी स्वतः हजेरी लावत कारवाई केली.
या धडक कारवाईनंतर पालकमंत्र्यांनी कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल जाधव यांना माहिती दिली. त्यामुळे जिल्हा पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांची कुमक तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ११ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, लॅपटॉप आणि मटक्याच्या पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, जिल्ह्यातील मटका व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री राणे यांच्या या धाडसी कारवाईने कणकवलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.



