Guardian Minister Atul Save | नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतीसह अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. याशिवाय जनावरे देखील वाहून गेली आहेत. एकीकडे नांदेडमध्ये निर्माण झालेल्या या पूर परिस्थितीदरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे मात्र लंडन दौऱ्यावर होते. आता सात दिवसानंतर पालकमंत्री अतुल सावे हे रविवारी नांदेडमधील मुखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. परंतु यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मदत न मिळाल्याने गावकरी आक्रमक पुरस्थितीनंतर ७ दिवसानंतर लंडनहुन आज पालकमंत्री अतुल सावे पूरग्रस्त मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात आले होते. त्यांनी अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे या खासदारांच्या उपस्थितीत परिस्थिती तसेच मदतकार्याचा आढावा घेतला. मात्र पूरग्रस्त भागात मोठे नुकसान झाले असताना गावकऱ्यांना अद्याप मदत न मिळाल्याने गावकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. १७ ऑगस्टच्या मध्यरात्री आलेल्या पुराने नांदेडचे जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील अनेक गावं उध्वस्त झाली आहेत. हसनाळ, रावणगाव ही गावे पूर्णतः या पुरात गाडल्या गेली. हसनाळ येथे पुराच्या पाण्यात सहा जणांचा मृत्यू, तर अनेक जनावरे दगावली आहेत. लेंडी धरणाचे अभियंता तिडके यांनी धरणातून रात्री न सांगता पाणी सोडल्याने ही दुर्घटना घडल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. या भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांना सात दिवसांनंतर वेळ मिळाल्याच्या मुद्यावरून पूरग्रस्त भागात लोकांनी संताप व्यक्त केला. अतुल सावे काय म्हणाले? याबाबत पालकमंत्री अतुल सावे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “नांदेड जिल्ह्यावरील पुराच्या संकटाच्या काळात मी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमानिमित्त परदेशात होतो. पण जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीकडे माझे लक्ष होते. जिल्हाधिकाऱ्यांशी माझा संपर्क होता. तेथून परतल्यावर मी तातडीने बाधित गावांना भेट देण्यासाठी आलो,” सावे म्हणाले आहेत. Guardian Minister Atul Save | हेही वाचा : Pune News | इच्छाशक्ती असेल तर बदल घडवता येतो – उपमुख्यमंत्री अजित पवार