GT vs MI : हार्दिक पंड्याने पुन्हा केली तीच चूक! BCCI ने ठोठावला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड, काय आहे कारण?

GT vs MI Hardik Pandya Fine of 12 lakhs for slow over rate : आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सने सलग २ सामने गमावले आहेत. हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईला चेन्नईच्या घरच्या मैदानावर पराभव स्वीकारावा लागला. हार्दिक पंड्या या सामन्यात खेळू शकला नाही. गेल्या हंगामात, स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती, ज्यामुळे त्याला चेन्नईविरुद्धच्या सामना खेळता आला नाही. यानंतर हार्दिक गुजरातविरुद्धच्या सामन्यात संघात परतला पण त्याने तीच चूक पुन्हा केली, ज्यामुळे त्याच्यावर पहिल्या सामन्यात बंदी घातली होती.
हार्दिक पंड्याला ठोठावला दंड –
आयपीएल २०२५ मधील मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना शनिवारी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे गुजरात टायटन्सविरुद्ध झाला. या सामन्यात गुजराने मुंबईचा ३६ धावांनी पराभव केला. या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हार्दिकवर का करण्यात आली कारवाई?
या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांना निर्धारित वेळेत २० षटके टाकता आली नाहीत, त्यामुळे शेवटच्या षटकात एक कमी क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या वर्तुळाबाहेर ठेवावा लागला. आयपीएल आचारसंहितेच्या नियम २.२ अंतर्गत, जो किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, मुंबई इंडियन्सचा हंगामातील हा पहिलाच गुन्हा होता आणि त्यामुळे पंड्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
हेही वाचा – GT vs MI : गुजरात टायटन्सने IPL 2025 मध्ये उघडले विजयाचे खाते, मुंबई इंडियन्सने गमावला सलग दुसरा सामना
सामन्याबद्दल बोलायचे, तर गुजरातने हा सामना साई सुदर्शनच्या शानदार अर्धशतकाच्या आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ३६ धावांनी विजय मिळवला. यासह गुजरातने यंदाच्या हंगामातील आपले विजयाचे खाते उघडले. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने सलग दुसरा सामना गमावला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने ८ बाद १९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ ६ गडी गमावून फक्त १६० धावाच करु शकला.





