GT vs MI : सलग ३ चेंडूंवर पडल्या ३ विकेट्स, पण पूर्ण झाली नाही हॅटट्रिक, काय होतं कारण? जाणून घ्या

GT vs MI Mumbai Indians pick 3 wickets in 3 balls against Gujarat Titans : आयपीएल २०२५ मध्ये आपापले पहिले सामने गमावल्यानंतर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आज एकमेकांसमोर आहे. अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी केली आणि खराब सुरुवातीनंतर, संघाने शेवटच्या षटकांमध्ये जोरदार पुनरागमन केले. एकदा, संघाने सलग तीन चेंडूंवर ३ विकेट्स घेतल्या पण तरीही कोणालाही हॅटट्रिक मिळाली नाही. असे का घडले? याबद्दल जाणून घेऊया.
आयपीएलच्या ९व्या सामन्यात यजमान गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी केली. त्यांच्या घरच्या मैदानावर नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळताना, गुजरातने दमदार सुरुवात केली. कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी पहिल्या विकेट्ससाठी ७८ धावांची भागीदारी केली. गिल बाद झाल्यानंतर, जोस बटलरनेही त्याच पद्धतीने डाव पुढे नेला. गुजरातने १८ व्या षटकात १७९ धावा केल्या होत्या आणि त्यांचे फक्त ४ विकेट्स पडल्या होत्या आणि संघ २०० धावांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत होते. पण अचानक विकेट्स पडल्या.
सलग ३ चेंडूंवर पडल्या ३ विकेट्स –
मुंबई इंडियन्सने सलग ३ चेंडूंवर गुजरातच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पण तरीही एकाही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली नाही. याची दोन कारणे होती. पहिले कारण म्हणजे हे ३ विकेट्स दोन वेगवेगळ्या षटकांमध्ये पडल्या. दुसरे म्हणजे, यापैकी एक धावबाद देखील होता. १८ व्या षटकात ट्रेंट बोल्टच्या शेवटच्या चेंडूवर साई सुदर्शन झेलबाद झाला. त्यानंतर १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नवीन फलंदाज राहुल तेवतिया धावबाद झाला. त्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शेरफेन रदरफोर्डही झेलबाद झाला. या दोन्ही विकेट दीपक चहरच्या षटकात आल्या. अशाप्रकारे, गुजरातने सलग ३ चेंडूत फक्त १७९ धावांवर ४ विकेट्स गमावल्या.
हेही वाचा – GT vs MI सामन्यात हार्दिकची कथित गर्लफ्रेंड जास्मिन वालिया त्याला चीअर करताना दिसली, पाहा VIDEO
गुजरातने उभारली मजबूत धावसंख्या –
गुजरातच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर, या ३ विकेट्स असूनही, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २० षटकांत ८ विकेट्स गमावून १९६ धावा केल्या. सलग दुसऱ्या सामन्यात, युवा सलामीवीर साई सुदर्शनने या संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. पहिल्या सामन्यात ७४ धावा करणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाने यावेळी ४१ चेंडूत ६३ धावा केल्या. त्याच वेळी, कर्णधार गिलने २७ चेंडूत ३८ धावांचे आणि जोस बटलरने २४ चेंडूत ३९ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. मुंबईकडून कर्णधार हार्दिक पड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ४ षटकांत फक्त २९ धावा देत २ विकेट्स घेतल्या.





