GST Registration : 1 नोव्हेंबरपासून छोट्या ऑनलाइन विक्रेत्यांना GST नोंदणी होणार सोपी
GST Registration : १ नोव्हेंबरपासून छोट्या ऑनलाइन व्यापाऱ्यांसाठी GST नोंदणी प्रक्रिया सोपी होणार आहे. दुसऱ्या राज्यात दुकान न उघडता ऑनलाइन विक्री करता येणार असून ITC नियमांचाही आढावा घेतला जात आहे.

GST Registration : छोट्या ऑनलाइन व्यापाऱ्यांसाठी GST नोंदणीची प्रक्रिया १ नोव्हेंबरपासून सोपी होणार आहे. नवीन सुविधेमुळे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दुसऱ्या राज्यात वस्तू विकण्यासाठी त्या राज्यात दुकान किंवा कार्यालय सुरू करण्याची गरज राहणार नाही. GST पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध होणार असून, त्यासाठी आवश्यक तांत्रिक बदल पूर्ण झाल्याची माहिती वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
GST परिषदेच्या ५७व्या बैठकीत छोट्या ऑनलाइन व्यापाऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. केंद्रीय GST नियमांमध्ये नवीन नियम 14B आणला जाणार आहे. त्यानुसार केवळ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून वस्तू विकणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना दुसऱ्या राज्यात GST नोंदणी करता येईल. यासाठी त्या राज्यात स्वतंत्र दुकान किंवा कार्यालय असणे आवश्यक राहणार नाही. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे वेअरहाउस व्यवसायाचा मुख्य पत्ता म्हणून दाखवता येईल. मात्र, संबंधित प्लॅटफॉर्मची संमती आवश्यक असेल.
उदाहरणार्थ, दिल्लीतील व्यापाऱ्याला महाराष्ट्रात ऑनलाइन वस्तू विकायच्या असल्यास महाराष्ट्रात दुकान उघडण्याची गरज भासणार नाही. मात्र, या सुविधेसाठी काही अटी आहेत. व्यापारी केवळ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे वस्तू विकणारा असावा. त्याचा एका महिन्यातील ITC वापर २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावा. तसेच, किमान एका राज्यात त्याचे आधीपासून व्यवसाय आणि GST नोंदणी असणे आवश्यक आहे. नवीन नोंदणीचा वापर केवळ ई-कॉमर्सद्वारे विक्रीसाठी करता येईल.
या बदलामुळे छोट्या व्यापाऱ्यांना देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया सोपी झाल्यास ऑनलाइन व्यवसाय वाढण्यास मदत होऊ शकते.
दरम्यान, ITC बाबतही सरकारकडून महत्त्वाची समीक्षा सुरू आहे. व्यापाऱ्याकडे योग्य बिल असले आणि त्याने पुरवठादाराला पैसे दिले असले, तरी पुरवठादाराने सरकारकडे कर भरला नसेल तर सध्या खरेदीदाराला ITC मिळत नाही. या नियमाचा आढावा घेण्यासाठी GST परिषदेने अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. समिती तीन महिन्यांत अहवाल देण्याची शक्यता आहे.
ITC नियमात बदल करण्याचा निर्णय झाल्यास तो १ एप्रिल २०२७पासून लागू करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे स्वतःचे कर नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना पुरवठादाराच्या चुकीमुळे होणाऱ्या ITC नुकसानातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नवीन GST नोंदणीसंदर्भात सविस्तर परिपत्रक आणि अधिसूचना सरकारकडून लवकरच जारी होण्याची अपेक्षा आहे.





