जीएसटी सुधारणेचा धमाका! कार, मोबाईल, टीव्ही स्वस्त होणार

नवी दिल्ली – केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी जीएसटीत सुधारणा करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे ज्या वस्तूवर 28 टक्के जीएसटी लागतो त्या वस्तू 18% टप्प्यात येणार आहेत. तर ज्या वस्तूवर 12% जीएसटी लागतो त्या वस्तू पाच टक्के टप्प्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत बर्याच वस्तू स्वस्त होणार आहेत.
ज्या वस्तू स्वस्त होणार आहेत, त्यामध्ये कार आणि दुचाकीचा समावेश गृहीत धरण्यात येत आहे. विशेषतः मोटरसायकलच्या किमती कमी होणार असल्यामुळे मध्यमवर्गीयांना याचा बराच लाभ होणार आहे.
दैनंदिन वापरातील बर्याच वस्तू नव्या पद्धतीमुळे स्वस्त होतील. त्यामध्ये टूथपेस्ट, गृहपयोगी वस्तू ज्यामध्ये शिलाई मशीन, प्रेशर कुकर, वॉशिंग मशीन, इत्यादीचा समावेश आहे. सायकल, तयार कपडे, पादत्राने, फरश्या, शेतीसाठीची अवजारे स्वस्त होणार आहेत.
त्याचबरोबर मोबाईल फोन, कॉम्प्युटर, तेल, प्रक्रियायुक्त पदार्थ, स्टेशनरी, वह्या, कंपास, स्वस्त होणार आहेत. टेलिव्हिजन, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, पिण्याचे पाणी, बांधकाम साहित्य, सिमेंट स्वस्त होणार आहे. कारण या वस्तूवर 28 ऐवजी 18% जीएसटी लागणार आहे. इलेक्ट्रिक कार वर सध्या केवळ 5% जीएसटी लागतो. या कर रचनेत कसलाही बदल अपेक्षित नाही.
यामुळे प्रथमदर्शनी तरी सरकारच्या महसुलावर 50 हजार कोटी रुपयांचा दबाव येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याबद्दल बर्याच राज्यांनी शंकाही व्यक्त केलीे आहे. मात्र केंद्र सरकारने वस्तूची विक्री वाढल्यामुळे कर संकलन वाढेल असा युक्तिवाद केला आहे. या विषयावर जीएसटी परिषदेत गरमागरम चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





