GST: देशातील नागरिकांना केंद्र सरकार लवकरच देणार मोठी ‘गुडन्यूज’

नवी दिल्ली – जीएसटी कराची आणि कराच्या टप्प्याची फेररचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच जीएसटी परिषद कराचे दर कमी करण्याबाबत आणि कराची टप्पे कमी करण्याबाबत निर्णय घेऊ शकेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितले.
सध्या जीएसटीचे पाच टप्पे आहेत. ते म्हणजे पाच टक्के, बारा टक्के, अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के. सर्वात जास्त कर लक्झरी वस्तूंवर 28 टक्के लावला जातो. तर खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तूवर सर्वात कमी म्हणजे पाच टक्के कर लावला जातो. कराचे दर आणि टप्पे कमी करण्याबाबत विविध राज्याचे अर्थमंत्री गेल्या तीन वर्षापासून काम करत आहेत. हे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे.
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर दात्यांना बर्याच सवलती दिल्या आहेत. आता जर जीएसटीचे दर आणि टप्पे कमी झाले तर सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर खरेदी वाढून अर्थव्यवस्थेला हातभार मिळणार आहे असे सितारामन म्हणाल्या. जुनी कर पद्धती गुंडाळण्याचा मुळीच उद्देश नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
भांडवली गुंतवणूक कमी नाही –
भांडवली गुंतवणूक कमी केल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला. त्या म्हणाल्या की, भांडवली गुंतवणूक वाढवून 11.21 लाख कोटी रुपये करण्यात आली आहे. जी की राष्ट्रीय उत्पन्नाच्या 4.3% इतकी आहे. गेल्या वर्षी 10.18 लाख कोटींची भांडवली गुंतवणूक झाली. 2023 मध्ये दहा लाख कोटी रुपयांची 2022 मध्ये 7.5 लाख कोटी रुपयांची तर 2021 मध्ये 5.54 लाख कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक झाली होती. यात प्रत्येक वर्षाला योग्य प्रमाणात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.


