नवी दिल्ली : जीएसटी परिषदेने व्यापक सुधारणा करत 375 वस्तूवरील जीएसटी दरात घसघशीत कपात केली आहे. याचा सकारात्मक परिणाम होऊन ऑक्टोबरमधील महागाई 0.85 टक्क्यांनी कमी होऊन केवळ 0.25 टक्के इतकी नोंदली गेली आहे. यामुळे रिझर्व बँकेला व्याजदर कमी ठेवण्यात यश मिळेल आणि त्याचा नागरिकांना आणि अर्थव्यवस्था सुधारण्यास लाभ होणार असल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. ऑक्टोबरमध्ये महागाई कमी झाली असतानाच आगामी काळातही यामुळे महागाई कमी पातळीवर राहण्यास मदत होणार असल्याचेही विश्लेषकांनी नमूद केले. महागाई सध्या अनेक वर्षांच्या निचांकावर असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांच्या अनावश्यक खर्चामुळे महागाई वाढण्यास मदत होते. सोन्याच्या दरात यावर्षी 57.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे एकूण महागाईच दर सध्या आहे त्या पातळीवर आहेत. जर सोन्याच्या किमती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या नसत्या तर ऑक्टोबरमधील किरकोळ महागाईचा दर उणे 0.57% इतका भरला असता असे स्टेट बँकेने या संदर्भात केलेल्या विश्लेषणात म्हटले आहे. सोन्याच्या किमती जर जास्त वाढल्या नाहीत तर आगामी काळात सोने वगळून महागाई 0% पेक्षा कमी पातळीवर राहण्याची शक्यता आहे. जीएसटी कपातीमुळे महागाई फार तर 0.75 टक्क्यापर्यंत कमी होईल असे आम्हाला वाटले होते. मात्र प्रत्यक्षात महागाई 0. 85% कमी झाली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मॅन्युफॅक्चरिंग वस्तूचा दर सध्या कमी आहे. मात्र अन्नधान्याच्या आणि फळांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. जर सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत अन्नधान्याची पुरवठा साखळी कार्यक्षम केल्यास अन्नधान्याची महागाई सुद्धा पूर्णपणे आटोक्यात राहू शकेल असे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजीव जुनेजा यांनी सांगितले. व्याजदर कपातील वाव ऑक्टोबर महिन्यातील महागाई केवळ 0.25% इतकी नोंदली गेली आहे. नोव्हेंबर महिन्यात या महागाईचा दर याच पातळीवर राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेला व्याजदर कपातीला वाव आहे. मात्र विकास दरही 7% पेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत रिझर्व बँक व्याजदर कपात करेल की नाही याबाबतही शंका घेतल्या जात आहेत. रिझर्व बँकेचे पुढील पतधोरण पाच डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.