नवी दिल्ली – देशात पहिल्यांदाच जीएसटी संकलनाचा आकडा दीड कोटींच्या पुढे गेला आहे. सरकारने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीत सांगीतले की, 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत एकूण 1.68 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. वार्षिक आधारावर तुलना केल्यास ते गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 20 टक्के अधिक आहे. याशिवाय, मार्च 2022 च्या मासिक संकलनाशी तुलना केल्यास, या महिन्यात 25 हजार कोटी अधिक GST संकलन झाले आहे. अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, एप्रिल महिन्यात एकूण 1,67,540 कोटी रुपये जमा झाले आहेत, त्यापैकी 33,159 कोटी रुपये सीजीएसटी (Central Goods and Services Tax), एसजीएसटी स्वरूपात (State Goods and Services Tax) 41,793 कोटी, आणि IGST (एकात्मिक वस्तू आणि सेवा कर) स्वरूपात 81,939 कोटी जमा झाले आहेत. IGST मध्ये 36,705 कोटी रुपयांच्या आयात मालावरील कराचाही समावेश आहे. याशिवाय 10,649 कोटी रुपये उपकर म्हणून मिळाले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अर्थ मंत्रालयाने सांगितले की, जीएसटीच्या अनुपालनामध्ये बरीच सुधारणा झाली आहे. कर भरण्याची प्रक्रिया करदात्यांना कर प्रशासनाकडून सुलभ करण्यात आली आहे. यासोबतच डेटा अॅनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून चुकीचे कर भरणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्यामुळे हे शक्य झाले आहे. आयात वस्तूंवरील कर संकलनात वाढ – जीएसटी संकलनावर सरकारकडून सांगण्यात आले की, एप्रिलमध्ये आयात केलेल्या वस्तूंवरील जीएसटी संकलनात सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, या कालावधीत देशांतर्गत व्यवहारांमधून जीएसटी संकलनात 17 टक्के वाढ झाली आहे. राज्यानुसार, जीएसटी संकलनात 2 टक्के ते 33 टक्के वाढ झाली आहे. प्रमुख राज्यांपैकी तामिळनाडूमध्ये 10 टक्के, महाराष्ट्रात 25 टक्के, गुजरातमध्ये 17 टक्के, कर्नाटकात 19 टक्के आणि उत्तराखंडमध्ये 33 टक्के वाढ झाली आहे.