GST Collection: ऐन युद्धाच्या काळात मार्च महिन्यामध्ये भारतीय ग्राहकांनी बरीच खरेदी केली आहे. अशा परिस्थितीत मार्च महिन्यामध्ये झालेले जीएसटी संकलन नऊ टक्क्यांनी वाढून दोन लाख कोटी रुपये इतके झाले आहे. जीएसटी दर कपातीनंतर संकलनात झालेली घट आता भरून निघाली असल्याचे वातावरण आहे. देशांतर्गत जीएसटी संकलन 5.9 टक्क्यांनी वाढून 1.46 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. तर आयातीद्वारा झालेले जीएसटी संकलन 17.8 टक्क्यांनी वाढून 53,861 कोटी रुपये इतके झाले आहे. म्हणजे देशांतर्गत आणि बाह्य खरेदीवरही युद्धाचा जास्त परिणाम झाला नसल्याचे दिसून येते. मात्र आयात वाढली असल्यामुळे काही विश्लेषण चिंता व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये ढोबळ जीएसटी संकलन 1.83 लाख कोटी इतके होते. 2025-26 या पूर्ण आर्थिक वर्षांमध्ये झालेले जीएसटी संकलन 8.3 टक्क्यांनी वाढून 22.27 लाख कोटी रुपये इतके झाले. सप्टेंबर महिन्यामध्ये जीएसटी परिषदेने 375 वस्तूंवरील जीएसटी कर कमी केला होता. अगोदर जीएसटी दराचे 5,12, 18, 28 टक्के असे टप्पे होते. ते कमी करून केवळ 5 आणि 18% हे जीएसटीचे दोनच टप्पे ठेवले होते. त्याचबरोबर महागड्या वस्तूंवर 40% जीएसटी ठेवण्यात आला होता. त्यानंतर जीएसटी संकलनावर काही महिने नकारात्मक परिणाम झाला. मात्र आता एकूणच खरेदी वाढत असल्यामुळे जीएसटी संकलन वाढत असल्याचे दिसून येते. जीएसटी कपातीनंतर जीएसटी संकलन नोव्हेंबर महिन्यात कमी होऊन 1.70 लाख कोटी, डिसेंबर महिन्यामध्ये 1.74 लाख कोटी, जानेवारी महिन्यामध्ये 1.93 लाख कोटी, फेब्रुवारी महिन्यामध्ये 1.83 लाख कोटी रुपये झाले होते. मार्च महिन्यामध्ये जीएसटी संकलन पुन्हा दोन लाख कोटी रुपयांच्या पातळीवर आले आहे. मार्च महिन्यात करदात्याना दिलेला परतावा 13.8 टक्क्यांनी वाढून 22,074 कोटी रुपये झाला आहे. त्यामुळे मार्च महिन्यातील निव्वळ कर संकलन वार्षिक पातळीवर 8.2 टक्क्यांनी वाढून 1.78 लाख कोटी रुपये इतके झाले आहे.