टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाचा मोठा पराभव झाला. त्यानंतर आता भारतीय खेळाडूंनी परदेशी टी-20 लीगमध्ये खेळायचे की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रत्येकाचे वेगवेगळे मत ऐकायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय खेळाडूंनी त्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी परदेशी टी-20 लीगमध्ये खेळावे, असा सल्ला चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग ( Stephen Fleming ) यांनी दिला आहे.
“आपण भारतीय क्रिकेटपटूंना पाठिंबा द्यायला हवा”, सचिन तेंडुलकर टीम इंडियाच्या पाठीशी
महत्वाचे म्हणजे, बीसीसीआय (BCCI) आपल्या खेळाडूंना आयपीएल (IPL) व्यतिरिक्त इतर कोणत्याही टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बीबीएल या मोठ्या टी-20 स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू खेळत नाहीत. तर दुसरीकडे इंग्लंडचे अनेक खेळाडू या लीगमध्ये खेळतात, त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अधिक अनुभव आहे. याशिवाय भारतीय खेळाडू सीपीएल आणि द हंड्रेडसारख्या स्पर्धांमध्येही सहभागी होत नाहीत. भारतीय खेळाडू व्यवसायिक क्रिकेटमध्ये फक्त आयपीएल खेळतात.
ईएसपीएन क्रिकइन्फोवर बोलताना स्टीफन फ्लेमिंग ( Stephen Fleming ) म्हणाला की, ‘जेव्हा तुम्ही समालोचकांना ऐकता तेव्हा ते सांगतात की, अॅलेक्स हेल्सला बीबीएल स्पर्धेमुळे ऍडिलेडच्या मैदानावर खेळण्याचा खूप अनुभव आहे. जगभरातील खेळाडू वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये खेळतात, त्यामुळे त्यांना विविध ठिकाणी खेळण्याचा खूप अनुभव मिळतो. याच कारणास्तव हेल्स जेव्हा आपल्या देशासाठी खेळतो तेव्हा त्याला या मैदानावर खेळताना फारशी अडचण येत नाही.”
स्टीफन फ्लेमिंग ( Stephen Fleming ) पुढे म्हणाले की, ‘पुढील टी-20 विश्वचषक वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाईल. त्यामुळे सीपीएल (CPL) स्पर्धा आता खेळाडूंसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना कॅरेबियन खेळपट्ट्यांची चांगली ओळख होईल आणि याचा संघाला खूप फायदा होईल. तसे पहिले तर भारतीय खेळाडूंना विदेशी खेळपट्ट्यांवर खेळताना अनेकवेळा अडचणी येतात. त्यामुळे भारताच्या खेळाडूंनी खरंच विदेशातील व्यावसायिक स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळावे की नाही? असा सवाल निर्माण झालाय.