सातारा | खुबी येथे विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

कराड, (प्रतिनिधी) – भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या दूरदृष्टीमुळे कराड दक्षिण मतदारसंघात गेल्या वर्षभरात विविध कामांसाठी 181 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यांच्यामुळे मतदारसंघात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी आणणार्या डॉ. अतुलबाबांना विधानसभेत आमदारकीची संधी द्या, असे आवाहन ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी केले.
खुबी, ता. कराड येथे साडेदहा कोटी रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मोहिते म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अतुलबाबांनी गेल्या वर्षभरात जेवढी विकासकामे कराड दक्षिण मतदारसंघात मंजूर करुन आणली, तेवढी कुठल्या तरी आमदाराने आणली आहेत का? डॉ. अतुल भोसले हे उमदे नेतृत्व आहे. सत्तेतील पद नसतानाही ते एवढी कामे करत असतील, तर आमदार म्हणून निवडून दिल्यास, ते यापेक्षा मोठी विकासकामे खेचून आणून या भागाचा कायापालट करतील. त्यामुळे त्यांना विधानसभेत काम करण्याची संधी द्यावी. सौ. शामबाला घोडके व वैभव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून खुबी-रेठरे बुद्रुक रस्ता रुंदीकरणासाठी साडेपाच कोटी, काळोबा पाणंद-कृष्णा कारखाना रस्ता डांबरीकरण 2.70 कोटी, कृष्णा कालवा-कामगार सोसायटी रस्ता डांबरीकरण 1.30 कोटी, नळपाणी पुरवठा योजना 53 लाख, 25/15 योजनेतून रस्ता काँक्रिटिकरण, नाले दुरुस्तीसाठी दहा लाख, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शामबाला घोडके यांच्या निधीतून शाळा दुरुस्तीसाठी तीन लाख, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब निकम यांच्या निधीतून सिद्धनाथ मंदिराजवळ हायमास्ट पोल, मुख्य चौकात पेव्हर ब्लॉक्स बसवणे, नागनाथ पाणंद रस्ता सुधारणा अशी कामे करण्यात येत आहेत.
यावेळी युवा नेते आदित्य मोहिते, कृष्णा कारखान्याचे संचालक बाजीराव निकम, कृष्णा बँकेचे अनिल बनसोडे, खुबीच्या सरपंच जयश्री माने, उपसरपंच राजेंद्र माने, प्रकाश माने, बाळासाहेब काशीद, हणमंतराव माने, कुबेर माने, संदीप माने, प्रकाश माने, सुनील माने व ग्रामस्थ उपस्थित होते.





