शहीद दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन

राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या कार्याला उजाळा
राजगुरुनगर (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्ताने येथील बस स्थानकातील स्मृतीशिल्पांना व हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय जन्मस्थळ स्मारकात 89 व्या पुण्यतिथी निमित्त सोमवारी (दि. 23) अभिवादन करण्यात आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने आणि निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम पार पडला.
शाहीद दिनानिमित्ताने पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या राजगुरूनगर बस स्थानक आवारातील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांच्या स्मृती शिल्पाला जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती आरगडे, राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे अध्यक्ष गणेश थिगळे, माजी अध्यक्ष विद्यमान संचालक किरण आहेर, ऍड. मुकुंद आवटे, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे, प्रांत अधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, शिवसेनेचे जिल्हा संघटक गणेश सांडभोर, अशोक दुगड आदी मान्यवरांनी शहीदांच्या स्मृतिशिल्पांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ स्मारकात सकाळी राजगुरूनगर बॅंकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र सांडभोर व संदीप वाळूंज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमावर देखील करोनामुळे निर्बंध घातले होते. यावेळी सुशील मांजरे, विठ्ठल पाचारणे, पिंटू विश्वनाथ गोसावी, पिंटू फलके, शैलेश रावळ उपस्थित होते.





