पुण्यात हरित क्रांती: आर. एम. धारीवाल फाऊंडेशनचे वृक्ष पुनर्रोपण अभियान

पुणे: पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात पुणे येथील आर. एम. धारीवाल फाऊंडेशनने एक नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे. गेली ४० वर्षे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि आपत्ती निवारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या फाऊंडेशनने आता ‘वृक्ष पुनर्रोपण अभियान’ सुरू केले आहे. हा उपक्रम फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), पुणे महानगर पालिका (PMC) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या सहकार्याने राबविला जात आहे. परिपक्व झाडांना कापण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करून नवजीवन देण्याचे अभियानाचे या उद्दिष्ट आहे.
विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न –
आजच्या काळात रस्ते, बांधकामे आणि इतर विकास प्रकल्पांसाठी दररोज हजारो झाडे तोडली जात आहेत. विकास आवश्यक असला तरी प्रत्येक परिपक्व झाड तोडणे म्हणजे पर्यावरणाची अपरिमित हानी करणे आहे. एक परिपक्व झाड दररोज ४ माणसांसाठी पुरेसा प्राणवायू निर्माण करते आणि दरवर्षी १० ते ४० किलो कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. काळजीपूर्वक पुनर्रोपण केल्यास ८०% झाडे यशस्वीपणे जगतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. याच तत्त्वावर आधारित, आर. एम. धारीवाल फाऊंडेशनने पुणे रिंग रोड, मुंढवा, घोरपडी आणि बी. जी. शिर्के रोड परिसरात २१०० हून अधिक परिपक्व झाडांचे यशस्वी पुनर्रोपण केले आहे.
पुणे रिंग रोड: आव्हान आणि संधी-
पुण्यातील १७२ किमी लांबीच्या रिंग रोड प्रकल्पामुळे हजारो झाडे तोडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी फाऊंडेशनने समाजातील सर्व घटकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “हे कार्य एका व्यक्ती किंवा संस्थेच्या क्षमतेपलीकडचे आहे. संस्था, कंपन्या आणि नागरिकांनी एकत्र येऊन ही चळवळ यशस्वी करावी,” असे जान्हवी धारीवाल बालन यांनी सांगितले. या अभियानात सहभागी होण्यासाठी फाऊंडेशनने काही पर्याय सुचवले आहेत:
निधी द्या: एका झाडाच्या पुनर्रोपणासाठी त्याच्या वय आणि आकारानुसार ५,००० ते ४०,००० रुपये खर्च येतो. तुमच्या आर्थिक सहाय्याने झाडांना शेतजमीन, लष्कराची जमीन किंवा जंगलात सुरक्षितपणे हलवता येईल.
झाड दत्तक घ्या: दोन वर्षांसाठी झाड प्रायोजित करून त्याच्या देखभालीसाठी योगदान द्या. यामुळे झाडाच्या जगण्याची शक्यता जवळपास १००% वाढते. २०, २५ किंवा ३० वर्षे वयाच्या परिपक्व झाडांचा लाभ पुन्हा मिळू शकेल.
जागा उपलब्ध करा: तुमच्याकडे जमीन किंवा परिसर असल्यास, पुनर्रोपित झाडांना आश्रय देऊन त्यांच्या वाढीस हातभार लावा.
जागरूकता पसरवा: सोशल मीडिया, समुदाय गट आणि इतर माध्यमांद्वारे या अभियानाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून हरित चळवळीला बळकटी द्या.
फाऊंडेशनचा वारसा आणि भविष्यकालीन दृष्टी-
१९८५ मध्ये रसिकलाल एम. धारीवाल आणि शोभा आर. धारीवाल यांनी स्थापन केलेल्या या फाऊंडेशनने ५० हून अधिक संस्थांमार्फत लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. शिक्षण, आरोग्य आणि आपत्ती निवारण क्षेत्रातील कार्याबरोबरच आता पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणाऱ्या या फाऊंडेशनने पुण्याला हरित भविष्य देण्याचा संकल्प केला आहे. “विकास आणि पर्यावरण संवर्धन हे हातात हात घालून पुढे जाऊ शकतात,” असे फाऊंडेशनचे म्हणणे आहे.
सहभागी होण्याचे आवाहन-
“आजच पाऊल उचला! एकत्र येऊन आपली झाडे आणि उद्याचे भविष्य सुरक्षित करूया,” असे फाऊंडेशनचे आवाहन आहे. अधिक माहिती आणि सहभागासाठी www.rmdfoundation.org.in/tree-transplantation या संकेतस्थळाला भेट द्या. पुण्यातील हरित क्रांतीला गती देण्यासाठी आपले योगदान अमूल्य ठरेल!


