फडणवीस सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेत 1250 कोटींचा ‘घोटाळा’

मुंबई, दि. 22 – फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबवलेल्या या मोहिमेत प्रत्यक्ष खर्च लपवण्यात आल्याचे समोर आले आहे. तब्बल 1250 कोटींचा हा घोटाळा झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधीर मुनंगटीवार यांनी राबवलेल्या वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली होती. 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्याचे जाहीर करण्यात आले होते.
चौकशी समितीने या मोहिमेत 1250 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवला आहे. प्रत्यक्ष खर्च 3688 कोटी झाला आहे. पण विधिमंडळामध्ये 2438 कोटी खर्च दाखवला आहे. तसेच या मोहिमेसाठी 250 कोटी जाहिरातीवर खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, माहिती जनसंपर्क विभागात हे टेंडर रेकॉर्डवर नसल्याचेही समोर आले आहे.
फडणवीस सरकारच्या काळात 33 कोटी वृक्षारोपण करण्यात आले होते. राज्यात वर्ष 2016 ते 2017 आणि 2019-20 या कालावधीत वन विभागाने वृक्ष लागवड योजनेत 28.27 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. 2017 ते 2019 कालावधीत वन विभागाने शासकीय यंत्रणा, शैक्षणिक संस्था, उद्योगसमूह, खासगी व्यक्ती यांच्या माध्यमातून 50 कोटी वृक्ष लावण्याची मोहीम राबाबण्यात आली होती.
ही मोहिम राबवण्यासाठी 2016-17 ते 2019-20 दरम्यान 2429.78 कोटी निधी मिळाला होता. तो पूर्व वापरण्यात आला. 25 टक्के रोपं जिवंत का राहिली नाही याची चौकशी करावी, अशी मागणी मंत्री दत्ताराय भारणे यांनी अधिवेशनात केली होती. त्यानंतर वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी केली जाईल. पुढील सहा महिन्यात चौकशी अहवाल तयार होणार असून तो सादर केला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.





