पुणे-जोधपूर दैनंदिन रेल्वेसेवेला हिरवा कंदील; राजस्थानी समाजाच्या पाठपुराव्याला यश

कात्रज : पुणे आणि जोधपूर दरम्यान दैनंदिन रेल्वेसेवेला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याने राजस्थानी समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली असून, रेल्वे क्रमांक 20495 (जोधपूर-हडपसर) आणि 20496 (हडपसर-जोधपूर) या सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्या लवकरच हडपसर रेल्वे स्थानकावरून नियमितपणे धावणार आहेत.
राजस्थानी समाज संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मागणी पूर्ण झाली असून, यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. रेल्वेचे बुकिंग लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष मगराज राठी यांनी दिली.
अनेक वर्षाच्या मागणीला यश –
पुणे जिल्ह्यातील राजस्थानी समाज गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-जोधपूर दरम्यान दैनंदिन रेल्वेसेवेची मागणी करत होता. या मागणीसाठी राजस्थानमधील खासदार पी. पी. चौधरी, केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत, पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह अनेकांनी रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला.
राजस्थानी समाज संघाने या मागणीला व्यापक पाठबळ देत आंदोलने, निवेदने आणि बैठका आयोजित केल्या होत्या. यापूर्वी साप्ताहिक रेल्वेसेवा सुरू झाली होती, परंतु समाजाची खरी मागणी दैनंदिन रेल्वेसेवेची होती, जी आता पूर्ण झाली आहे.
बस प्रवासातील जोखमीला आळा –
पुणे-जोधपूर दरम्यान सध्या दररोज सुमारे 60 ते 70 बसेस धावतात. या बस प्रवासादरम्यान वारंवार होणारे अपघात आणि त्यात होणारे जीवितहानी यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. मगराज राठी यांनी सांगितले, “बस प्रवासात अपघातांमुळे अनेक निष्पाप जीव गमवावे लागले. दैनंदिन रेल्वेसेवेमुळे प्रवास सुरक्षित होईल आणि प्रवाशांना परवडणारा, आरामदायी पर्याय मिळेल.” राठी यांनी रेल्वे मंत्रालय, अश्विनी वैष्णव आणि सर्व सहभागींचे आभार मानले, तसेच ही सेवा लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
रेल्वेचे थांबे आणि मार्ग –
ही सुपरफास्ट एक्स्प्रेस पुणे आणि जोधपूर दरम्यान पाली, मारवाड, अबू रोड, पालनपूर, मेहसाना, अहमदाबाद, बडोदरा, सुरत, वापी, वसई रस्ता, कल्याण, लोणावळा, चिंचवड या प्रमुख स्थानकांवर थांबा घेईल.
हडपसर रेल्वे स्थानकावरून सुटणारी ही गाडी पुणे परिसरातील प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरेल. या मार्गावरील अनेक शहरांमध्ये मोठ्या संख्येने राजस्थानी समाज वास्तव्यास आहे, त्यामुळे या रेल्वेमुळे त्यांचा प्रवास सुलभ होईल.




