शेतकऱ्यांना मोठा दिलासा! नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज

मुंबई – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तीन लाखांपर्यंत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे. यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
या निर्णयामुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. या निर्णयासंदर्भात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, 1 ते 3 लाखापर्यंत पिक कर्ज घेणाऱ्या आणि ते नियमित फेडणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. यापूर्वी 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत होते. त्यावर 3 लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याज भरावे लागत होते. आता 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे, असे ते म्हणाले.
पाटील म्हणाले की, राज्यातील 45 लाख शेतकरी याचा फायदा घेऊ शकतात. यंदा सरकारने 60 हजार कोटीचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, पीक कर्जावर व्याज देताना अनेकदा शेतकऱ्यांची अडचण होते.
शेतकऱ्यांना व्याजाच्या बोजापासून मुक्त करण्याचे उद्दीष्ट लक्षात घेऊन त्यांना कर्ज थकबाकी होण्यापासून रोखण्यासाठी सरकारने तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. पीक कर्जावरील व्याजाची रक्कम सरकार देईल. आवश्यक निधी शासनाकडून पुरविला जाईल, असे अजित पवार त्यावेळी म्हणाले होते.





