अक्षरक्रांतीचे महानायक : महात्मा बसवेश्वर

आज जगात मानवकल्याण आणि लोकहीत जोपासण्यासाठी जी धडपड सुरू आहे, ती 12 व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी आचरणात आणली होती. अशा महात्म्याची आज जयंती. त्यानिमित्त जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या कार्याबद्दल अधिक माहिती…
विश्वगुरू महात्मा बसवेश्वर हे आपल्या देशात 12 व्या शतकात होऊन गेलेले समग्र क्रांतीचे महानायक. त्यांनी अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक जी क्रांती केली ती मानवकूलाच्या इतिहासात एक अपूर्व सुवर्णहस्त लिखित,अद्भूत सुवर्णपान आहे.
महात्मा बसवेश्वर व बसवादी शरणगण यांनी बोधलेली व त्या कृतीतून आचरणात आणलेली तत्त्वे हे चिरकाल टिकलेली आहेत. जगाला ज्या समस्या भेडसावणाऱ्या आहेत, त्यांचे समाधान, उकल शरण संस्कृतीने दाखविलेल्या मार्गाने सोडविण्यासाठी उपयुक्त व हितकारक आहेत.
12 व्या शतकात महात्मा बसवेश्वर व बसवादी शरणगण यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या भागातून आणि वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतून अनुभव मंटपात एकत्र आलेल्या शिवशरणांनी एकाच समान पातळीवर लिंग, जात-पात, वर्गविरहित आचार-विचारांची देवाणघेवाण केली. त्यातून नवसमाज निर्मितीचा एक दीप लावला, तो म्हणजे लिंगायत लोकचळवळ.
महात्मा बसवेश्वर यांच्या नेतृत्वाखाली देशात विश्ववंद्य क्रांती झाली. तिचा मुख्य उद्देश हा सकल मानव कल्याण होता. यासाठी आणि ते विचार जोपासण्यासाठी महात्मा बसवेश्वर यांनी आपले तत्त्वज्ञान संस्कृत भाषेचा वापर न करता लोकांना सहज समजणाऱ्या कन्नड भाषेतून मांडले. निरक्षर, अन्यायाने त्रस्त, कोणताही अधिकार नसणाऱ्या पिचत पडलेल्या लोकांना सामावून घेण्याचे व त्यांना सर्वाधिकार देण्याचे क्रांतिकारी किमया महात्मा बसवेश्वर यांनी केली. जात-पात, धर्मभेद, उच्च-नीच, लिंगभेद यांच्या त्यागकरून प्रथम समाजाला साक्षर करण्याचे कार्य अनुभव मंटपस्थित प्रथम जागतिक लोकसंसदेत करण्याचे महान कार्य महात्मा बसवेश्वर यांनी केले. अक्षरक्रांती झाल्याशिवाय साहित्य क्रांती होणारा नाही, वा साहित्य क्रांती झाल्याशिवाय सामाजिक क्रांती होणार नाही हे महात्मा बसवेश्वर यांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी सुरुवातीला सर्वसामान्य व्यक्तींना अक्षरज्ञानी केले.
“एक स्त्री शिकली, की पूर्ण कुटूंब साक्षर होते’ याची प्रचिती महात्मा बसवेश्वर यांनी 12 व्या शतकात दिली आहे. त्यांच्या अनुभव मंटपात 70 शरणी म्हणजे महिला होत्या. त्यांना साक्षर करण्याचे कार्य बसवेश्वरांनी केले. ज्यावेळी पुरूषांना साक्षर करणे अशक्य होते, तेव्हा बसवेश्वरांनी महिलांना साक्षर करत सनातनी विचारांना मोठा धक्का दिला.
समाजात कोणतेही स्थान अमान्य करणाऱ्या लोकांना वचनसाहित्य रुपात समाज परिवर्तन करणारे महान क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर हे आहेत. त्यांनी जी समतेची लोकचळवळ उभी करून सर्वसामान्य व्यक्तींना या चळवळीचे नायक केले. आध्यात्मिक लौकिकाबरोबर समता, समानता, बंधुता या मानवी विकासमूल्यांची जोपासना करण्यासाठी देशभरातील मोठा जनसमुदाय कल्याणस्थीत अनुभव मंटपाकडे लोटला. यात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकसह गुजरात, काश्मीर, कलिंग, अफगाणिस्तान इ.वेगवेगळ्या क्षेत्रातून कल्याणस्थीत अनुभव मंटपात आले. तेथील शरणसमुदायांनी त्यांना कन्नड शिकवून वचनसाहित्य निर्माण केले. अशा या महात्म्यास आणि थोर समाजसुधारकास विनम्र अभिवादन.

