अस्मिताच्या वाचकांना नमस्कार. आजचे पुस्तक म्हणजे थरकाप उडवणारी एक सत्य घटना आहे. ती गरीब कुटुंबातून आलेली स्वतःला घडवायला. सुंदर, गोड पण तितकीच करारी, सडेतोड, टापटीप अन कामात अत्यंत सावध अन तत्पर. बहारदार आयुष्य समोर असताना अचानक एक घटना घडते अन क्षणार्धात आयुष्य बदलून जाते अन उदयास येते ती फक्त तिची गोष्ट…
“अरुणाची गोष्ट’ मूळ लेखिका आहेत पिंकी विराणी. या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे मीना कर्णिक यांनी. अरुणा शानबाग छोट्याशा गावातून एक स्वप्न बाळगून आलेली ध्येयवेडी 24 वर्षीय मुलगी नर्स म्हणून केईएम हॉस्पिटलमधे कामाला लागते. मुळातच सुंदर, मनमोकळी अन कामात अत्यंत जागरूक असलेली अरुणा बघता-बघता सगळ्यांची मन जिंकून घेते. अरुणाच्या या गुणांना भाळून हॉस्पिटलमधील हुशार डॉक्टर संदीप सरदेसाई तिला लग्नाची मागणी घालतो. एका डॉक्टरने नर्सला मागणी घालणे म्हणजे दुर्मिळ गोष्टच!
अरुणा पुन्हा एकदा कौतुकाचा विषय बनते. लग्नाची तयारी सुरु असताना हॉस्पिटल तिच्यावर काही दिवस तिला कुत्र्यांचा विभाग सोपवते. कुठल्याही कामात कसूर होऊ न देणारी अरुणा हे काम ही स्वीकारते. तिच्या हाताखाली काम करत असलेला वॉर्डबॉय सोहनलाल कुत्र्यांसाठीचे अन्न चोरून खातो, या गोष्टीचा सुगावा लागताच ती त्याला येता-जाता रागावते अन कामावरून काढून टाकण्याची धमकीही देते.
अरुणाचा फटकळ स्वभाव, येता-जाता घालून-पाडून बोलणे सोहनलालला सहन होत नाही. लग्नाची तयारी करण्यासाठी अरुणा सुट्टीवर जाण्याआधीच तिच्यावर सूड उगवण्याचे ठरवतो. अचानक महत्वपूर्ण काम आल्यामुळे हॉस्पिटलच्या तळघरात कपडे बदल्यांसाठी गेलेल्या अरुणावर आधीच दबा धरून बसलेला सोहनलाल हल्ला करतो. कुत्र्याच्या चेनने तिचा गळा आवळतो अन पाशवी अत्याचार करून तिला तिथेच सोडून जातो.
रक्ताच्या थारोळ्यात शुद्ध हरपलेले अरुणा त्यातून वाचते खरी पण पुढील कित्येक वर्ष ती त्या वेदना हॉस्पिटलच्या एका बेडवर काढते. अर्धवट कोमात गेलेल्या, संपूर्ण अवयव निकामी झालेल्या अरुणाला साथ देतात तेथील नर्स, तीन दिवस संप पुकारून तिला न्याय देण्याचा प्रयत्न करतात; तिची सुश्रुषा करतात.
सगळे माहीत असूनही सोहनलालविरुद्ध कोणीही बलात्काराची केस उभी करत नाहीत अन् तो नराधम अवघ्या सात वर्षात सुटतो. दुदैवी अरुणा, एका खोलीत असंख्य वेदना सहन करत मरणाची वाट पाहत अनेक वर्ष पडून राहते. वर्ष 1973 ते 2015 अत्यंत जीवघेणा त्रास सहन करत ती जगते. एक घटना अरुणाची स्वप्न मातीमोल करतात अन उरते फक्त, तिची जगाला हेलावून टाकणारी गोष्ट. नक्की वाचा.
– मनीषा संदीप