71 हजार रिक्षाचालकांच्या बॅंक खात्यात अनुदान जमा

मुंबई – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या निर्बंध काळात परवानाधारक रिक्षाचालकांना सानुग्रह अनुदान देण्यात येत असून सुमारे 71 हजार रिक्षाचालकांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.
आजपर्यंत एकूण 2 लाख 65 हजार 465 रिक्षा परवानाधारकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. उर्वरित परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.
करोनाच्या निर्बंध काळात दुर्बल घटक व हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकांना एकूण 108 कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले होते. राज्यात 7 लाख 15 हजार रिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येत आहे.
परिवहन विभागामार्फत एक ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून ती दि. 22 मे 2021 पासून परवानाधारक रिक्षाचालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता खुली करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण 2 लाख 65 हजार 465 रिक्षा चालकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. त्यापैकी 71 हजार 40 रिक्षा चालकांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 1 लाख 5 हजार रिक्षा चालकांच्या बॅंक खात्यामध्ये सदर रक्कम जमा करण्याबाबत एनपीसीआय यांना कळविण्यात आले आहे, असे परिवहनमंत्र्यांनी सांगितले.





