पुणे | सात वर्षांनी होणार आजी आजोबांची नातवाशी भेट!

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पती- पत्नीच्या वादात मुलांची आबाळ होते. त्यात मुलाचा ताबा कोणा एका पालकाकडे असेल, तेव्हा दुसऱ्याला वेदना सहन कराव्या लागतात. अशाच एका प्रकरणात गेल्या सात वर्षांपासून नातवाचे तोंडही पाहू न शकलेले आजी-आजोबा आता न्यायालयाच्या आदेशाने पंधरा दिवस नातवासोबत राहू शकणार आहेत.
शाळेला उन्हाळ्याची सुटी लागल्याने २० मे पासून ३ जूनपर्यंत आईकडे असलेला मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के. ए. बागे- पाटील यांनी दिले आहेत.
राजेश आणि राजश्री (दोघांची नावे बदलली आहेत) यांचे अरेंज मॅरेज झाले. राजेश हा चालक असून, राजश्री उच्चशिक्षित आहे. त्यांचा राम नावाचा मुलगा सातवीत शिकतो. आई वडिलांमध्ये भांडणे झाल्याने मागील सात वर्षांपासून दोघे वेगळे राहतात.
मुलाचा ताबा आईकडे आहे. सध्या त्याच्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे त्याचा एक महिन्याचा तात्पुरता ताबा देण्याच्या मागणीसाठी त्याच्या वडिलांनी ॲड. गायत्री कांबळे यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता.
मला मुलाला भेटण्याचा हक्क आहे; परंतु पत्नी जाणीवपूर्वक मुलाची भेट घेण्यापासून आपल्याला रोखत आहे. माझे आई- वडील २०१७ पासून नातवाला भेटू शकलेले नाहीत. ते त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे मुलाचा तात्पुरता ताबा देण्यात यावा, अशी मागणी पतीने या अर्जात केली. पत्नीने या मागणीला विरोध केला.
पतीला दारूचे व्यसन असून, त्याच्या अंमलाखाली त्याने मुलासमोर मला मारहाण केली आहे. त्यामुळे मुलाच्या मनात वडिलांविषयी दहशत असून, त्याच्या घरी मुलाची काळजी घेणारे कोणीही नाही. मीच मुलाची जबाबदारी घेतली असून, त्याचा ताबा अचानक नवऱ्याला देणे वेदनादायी आहे, असे राजश्रीचे म्हणणे होते.
न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. राजेश हे मुलाचे वडील असून, त्यांना आपल्या मुलाला भेटण्याचा समान हक्क आहे, असे नमूद करत न्यायालयाने १५ दिवसांसाठी त्याचा ताबा वडिलांकडे दिला. या कालावधीत राजेश आणि त्याचे कुटुंबीय मुलाशी आईबद्दल किंवा न्यायालयात दाखल खटल्याबद्दल काहीही बोलणार नाहीत.
आई मुलाशी टेलिफोन किंवा व्हिडिओ कॉलवर बोलू शकते, तसेच हा कालावधी संपल्यावर मुलाचा ताबा पुन्हा आईकडे देण्यात यावा, अशी अट न्यायालयाने घातली आहे.
पती पत्नीचा वाद असला, तरी त्याचा फटका मुलांना बसता कामा नये. यात मुलांचा काहीही दोष नसतो. अपत्याला आई आणि वडील या दोघांचेही प्रेम मिळणे आवश्यक असते. मुलांवर आई- वडील दोघांचाही समान अधिकार असतो. तो अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हेच न्यायालयाने निकालातून दाखवून दिले आहे. – ॲड. गायत्री कांबळे, पतीच्या वकील.





