‘दादा स्वगृही परत या; आम्हाला तुमची गरज शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिंदे गटातील शिवसैनिकांचा आग्रह

रांजणगाव गणपती (वार्ताहर ) : शिरुर लोकसभा मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन तिकीट घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आणि तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडुन पराभव स्वीकारावा लागला. परंतु पराभवाने खचुन न जाता आढळराव यांनी पुन्हा कंबर कसली असुन नुकतीच म्हाडाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली असुन आढळराव पाटील यांनी परत शिवसेना (शिंदे गट) पक्षात यावे अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी आज लांडेवाडी येथे केली.
लोकसभा निवडणुकीत महायुतीची शिरुरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांना त्यांची हि भुमिका रुचली नाही. त्यामुळे मतदारांनी आढळराव यांना नाकारले आणि कोल्हे यांना निवडुन दिले. परंतु आढळराव यांनी पुन्हा शिवसेना (शिंदे गट) पक्षात यावे अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली असुन आढळराव हे पुन्हा शिवसेनेत आल्यास पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकत वाढेल असे मत सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, युवासेना जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख इरफान सय्यद, शिरुर-आंबेगाव तालुकाप्रमुख मल्हारी काळे, शिरुरचे तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, हवेलीचे तालुकाप्रमुख विपुल शितोळे, खेडचे तालुकाप्रमुख राजेंद्र जवळकर, जिल्हा परिषदचे गटनेते देविदास दरेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल काशिद, शरद नवले, शिरुर युवासेना प्रमुख विष्णु वाळके, तालुका संघटक दत्ता गिलबिले, युवा कार्यकर्ते वैभव ढोकले, आण्णा हजारे आदी कार्यकर्त्यांनी हि आग्रही मागणी केली आहे.





