दुहेरी हत्याकांडाने वाशिम हादरलं ! ‘या’ कारणामुळे नातवाने थेट आजी- आजोबांना संपवलं

वाशिम : वाशिममधून नातू आणि आजी – आजोबांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये संपत्तीच्या वादातून नातवाने आपल्या आजी- आजोबांची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी नातवासह त्याच्या तीन मित्रांना अटक केली आहे.
कशी उघडकीस आली घटना?
मानोरा तालुक्याच्या इंझोरी परिसरातील अडाण धरणामध्ये प्रल्हाद वीर या वृद्धाचा मृतदेह 6 ऑगस्ट रोजी आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता घरात रक्ताचे डाग आढळून आले होते. तसेच त्यांची पत्नी निर्मला वीर देखील बेपत्ता असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना शेजारील घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर नातवासह त्याला मदत करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.
मानोराच्या मंगरुळपिर रोड वरील एका घरात प्रल्हाद वीर आणि निर्मला वीर हे वृद्ध दाम्पत्य राहत होते. रविवार 4 ऑगस्ट 2024 रोजी रात्री त्यांचं आणि नातू प्रतीक वीर यांच्यामध्ये कार वरून वाद झाल्याचं समजते. त्यानंतर या वादात प्रल्हाद वीर यांचा धारधार शस्त्राने शरीरावर वार करून खून करण्यात आला. याच वेळी प्रतीक वीरची आजी निर्मला वीर यांचाही गळा दाबून खून करून आरोपींनी दोघांचे मृतदेह कार मध्ये टाकून अडाण धरणात फेकून दिले.तसेच मृतदेह धरणात टाकून देण्यासाठी वापरलेली कार प्रतीक वीरने जालना जिल्ह्यातील भोकरधन इथं मित्राकडे नेऊन ठेवली. यानंतर पोलिसांनी आरोपीला सायखेडा येथुन ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी नातू प्रतीक वीर व त्याला मदत करणारे विकास भगत, जगदीश देवकर, आणि जीवन फडके अशा तिघांना अटक केली आहे.





