पुसेगाव – खटाव तालुक्यातील उत्तर भागातील बुध, राजापूर, पांगरखेल, काटेवाडी परिसरात सलग पाच ते सहा दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे काटेवाडी गावातील पूल तीन दिवसापासून पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे नाविन पुल बांधावा अशी मागणी सरपंच शुभांगी कोरडे व उपसरपंच वैभव कोरडे यांनी केली आहे. काटेवाडी हे भागातील बागायती शेतीसाठी प्रसिद्ध आहे. या गावातील शेतातील कांद्याचा ऐरणी पाण्यात असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच कोबी भाजीपालांच्या शेतामध्ये पाणी असल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. तीन दिवस झाले गावातील जे नागरिक घरा बाहेर आहेत त्यांना घरी जाता येत नाही. आणि घरी जाण्यासाठी काटेवाडी बुध इतर पर्याय मार्ग उपलब्ध असून तो पूर्ण चिखल युक्त रस्ता आहे. त्यामुळे गावाचा संपर्क तुटलेला आहे, अशा आपत्कालीन परिस्थितीत गावात कोणती इजा झाली किंवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे असेल तर त्या व्यक्तीला रस्त्यावीणा घेऊन जाता येणार नाही. काटेवाडी बुध रस्त्याशिवाय अन्य कोणताही पर्याय मार्ग उपलब्ध नाही. प्रत्येक गावाला 1 तरी पर्याय मार्ग असावा त्यामुळे अनुचित प्रकार टळू शकतो. प्रशासनाला वारंवार विनंती करून मंत्रालय येते तक्रार दाखल करून सुद्धा त्यांनी काटेवाडी बुध हा जुना रस्ता अद्याप केलेला नाही. तसेच काटेवाडी गावच्या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे पांगरखेल, राजापूर, बुध, रणशिंगवाडी पासून सर्व गावांचे पाणी काटेवाडी गावच्या ओढ्याला येते त्यामुळं पुलाची उंची वाढवली पाहिजे. उंची न वाढवल्याने व नेर धरण जवळ असल्याने अशा आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, सध्या पावसाच्या पाण्याने धोक्याची परिस्थिती ओलांडली आहे त्यामुळे भाजीपाला, कांदे व इतर शेतातील पिकाचे आतोनात नुकसान झालेले आहे. त्यासाठी प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून पुलाची उंची वाढवावी आणि काटेवाडी बुध रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करावे. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत इतर पर्यायी रस्त्याने ये जा करता येईल.