Pimpri : आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे हरभऱ्याची भाजी

कान्हे : रब्बी हंगामांतील महत्वाचे पीक असलेला हरभरा सध्या जोमाने बहरु लागला आहे. हिवाळ्यात हरभऱ्याचा कोवळा पाला खुडून त्याची भाजी केली जाते. भरपूर लोहसत्व असल्याने हरभऱ्याची भाजी खाणे आरोग्यदायी मानले जाते. थंडीची तीव्रता वाढली असल्याने अनेक खवय्यांनी आपला मोर्चा सध्या हरभऱ्याच्या भाजीकडे वळविला आहे. मावळ तालुक्यात ग्रामीण भागात तर दुपार – संध्याकाळ जेवणात हरभऱ्याची भाजीचा समावेश केला जातो.
मावळ तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी झाली आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या रब्बी हंगामातील हरभऱ्याचा पेरा अधिक आहे. हरभऱ्याचे पिकही आता पोषक हवामानामुळे जोमाने वाढत आहे. जेवढी थंडी अधिक तेवढे हरभऱ्याचे पीक चांगले बहरते आणि अशाच या थंड वातावरणात हरभऱ्याची भाजी खाणे देखील आरोग्यासाठी लाभदायक असते.
हरभऱ्याची कोवळी पाने ही विविध कारणांमुळे शरीरास पोषक असतात. हरभऱ्याची पाने खुडून ही भाजी बाजारात विकण्यासाठीही आणली जाते. आरोग्यदायी ही भाजी खरेदीसाठी नागरिकही उत्साह दाखवितात. मावळातील कामशेत, लोणावळा, तळेगाव आदी शहरांत हरभऱ्याची भाजी विक्रीस आली आहे. तसेच आठवडी बाजारात अनेक शेतकरी महिला ही भाजी विकताना दिसतात.
भरपूर प्रोटीन असलेली भाजी
हरभऱ्याची कोवळी पाने खुडून त्याची भाजी बनवतात. हरभऱ्याच्या भाजीत भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असते. यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. हरभऱ्याच्या भाजीमध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट मुळे शरीराचा थकवा दूर होऊन ऊर्जा मिळते. तसेच भाजीतील आयर्न हे रक्ताच्या कमतरतेपासून बचाव करते. त्यामुळे हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी लाभदायक असते. हरभरा वनस्पतींचे सर्व भाग उपयुक्त असून बियांत प्रथिने व कार्बोहायड्रेट्स तसेच जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. जेवणामध्ये हरभऱ्याचा कोवळा पाला, पीठ व डाळ यांचा भरपूर उपयोग त्यामुळे केला जातो.





