दोन दिवसांत 13 हजार 270 कार्डधारकांनी घेतले धान्य
पिंपरी – शहरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये केशरी शिधापत्रिका धारकांना धान्य वाटपाला सुरुवात झालेली आहे. गेल्या दोन दिवसांत 13 हजार 270 कार्डधारकांना मे महिन्यासाठी धान्य वाटप करण्यात आले आहे.
शासनाने केशरी रेशनकार्ड असलेल्या नागरिकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार 8 रुपये किलो गहू आणि 12 रुपये किलो तांदूळ या दराने धान्य दिले जात आहे. एका व्यक्तीला 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिला जात आहे. मे आणि जून महिन्यांसाठी हे धान्य दिले जाणार आहे. सध्या मे महिन्यातील धान्याचे वाटप सुरू झाले आहे. शहरामध्ये अन्नधान्य वितरण अधिकारी (पुणे) यांच्या अंतर्गत पिंपरी आणि चिंचवड विभागामध्ये एकूण 1 लाख 42 हजार केशरी रेशनकार्ड धारक आहेत. 170 स्वस्त धान्य दुकानांतून या कार्डधारकांना धान्य वाटप केले जात आहे.
टोकन पद्धतीचा वापर
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धान्य वाटपाच्या वेळी स्वस्त धान्य दुकानांमध्ये गर्दी होऊ नये, या उद्देशाने टोकन पद्धतीचा वापर सुरू झाला आहे. त्यामध्ये दिवसभरात जेवढ्या कार्डधारकांना धान्य देणे शक्य होणार आहे, त्यांना टोकन दिले जात आहे. त्यानुसार पहिल्या 15 ते 20 जणांना रांगेत उभे राहण्यास सांगितले जाते. अन्य टोकन धारकांना वेळ देऊन त्या वेळी धान्य घेण्यास येण्यासाठी सांगितले जाते. दिवसभरात ज्यांना धान्य देणे शक्य होत नाही त्यांना टोकन देऊन धान्य घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी बोलावले जाते आहे.
केशरी रेशनकार्ड धारकांसाठी आवश्यक धान्य पुरवठा करण्यात आलेला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये चिंचवड विभागातंर्गत 9 हजार 560 जणांना धान्य वाटप करण्यात आले. तर, पिंपरी विभागातंर्गत 3 हजार 710 केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य दिले आहे. स्वस्त धान्य दुकानांतील गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर केला जात आहे.
– दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, निगडी.