विधानपरिषदेसाठी भाजपा-राष्ट्रवादी-मनसे-शिवसेना एकमेकांविरोधात ; भाजपकडूनही उमेदवार जाहीर

Graduate-Teacher Election। लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा नुकताच पार पडला. त्यानंतर आता सर्वाना उत्सुकता लागलीय ती म्हणजे निकालाची. मात्र देशपातळीवर निकालाचे वेध लागले असताना राज्यातील राजकारणात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महायुतीने एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. मनसेने याची सुरुवात करत कोकण पदवीधर मतदारसंघात अभिनेते अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी जाहीर केली. आता भाजपानेही आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेत.
भाजपाकडून ‘हे’ अधिकृत उमेदवार जाहीर Graduate-Teacher Election।
विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी भाजपाने आज त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. जाहीर केलेल्या उमेदवारानुसार मुंबई पदवीधर मतदासंघासाठी भाजपाकडून किरण शेलार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाने तीनही उमेदवार जाहीर केल्यानंतर महायुतीमध्येच आता चुरस वाढल्याचे दिसत आहे. ही आगामी विधानसभा निवणुकीची नांदी आहे का? अशीही चर्चा होत आहे.
पदवीधर, शिक्षक मतदारसंघांतील निवडणूक कधी? Graduate-Teacher Election।
विधान परिषदेच्या चार जागांसाठी एप्रिल महिन्यात कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार १५ जूनला मतदान होणार होते. पण शाळांना सुट्टी असल्याने मतदानाची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी विविध राजकीय पक्ष तसेच शिक्षकांच्या संघटनांकडून करण्यात आली होती. दोन आठवड्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आलेल्या निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक लांबणीवर टाकली होती. आता नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. यानुसार २६ जूनला मतदान होईल. मतमोजणी १ जुलैला करण्यात येणार आहे. ३१ मे ते ७ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.





