Pune : पुण्यात रंगणार शासकीय अधिकारी साहित्य संमेलन

पुणे : प्रशासनात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे लेखनसाहित्य समाजापुढे यावे, या उद्देशाने पहिल्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २० ते रविवार, दि.२२ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुण्यात बालगंधर्व रंगमदिर येथे हे संमेलन होणार आहे.
याबाबतची माहिती संमेलनाचे निमंत्रक सुनील महाजन यांनी दिली. या संमेलनाच्या अध्यक्षपदी यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले स्वागताध्यक्ष आहेत.
महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी विविध परिसंवाद, चर्चासत्रे, कविसंमेलनातून व्यक्त होणार आहेत. आजी-माजी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे, चित्र-छायाचित्रांचे प्रदर्शन, नव्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन असे विविध कार्यक्रम संमेलनादरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. संमेलनाचा उद्घाटन सोहळा २१ डिसेंबर सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. संमेलन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने वरिष्ठ व सनदी अधिकारी यांना ऐकण्याची व भेटण्याची नामी संधी अधिकारी-कर्मचारी, नागरिक आणि पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.




