Odisha Train Accident : बंगालमधील मृतांच्या कुटूंबीयांना सरकारी नोकऱ्या, ममता बॅनर्जींची घोषणा

कोलकता – ओडिशामधील तिहेरी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पश्चिम बंगालमधील प्रवाशांच्या कुटूंबीयांना सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. त्याविषयीची घोषणा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली. अपघातात शरीराचे अवयव गमावलेल्यांच्या कुटूंबीयांनाही सरकारी सेवेत सामावून घेतले जाईल.
ओडिशातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांत बंगालमधील प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्या मृतांच्या कुटूंबीयांना दिलासा देण्यासाठी ममता यांचे सरकार पुढे सरसावले आहे.
रेल्वे अपघातात जखमी झालेल्या 206 बंगालींवर सध्या ओडिशातील विविध रूग्णालयांत उपचार चालू आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी ममता उद्या (मंगळवार) भुवनेश्वर आणि कटक या ओडिशातील ठिकाणांचा दौरा करणार आहेत.
त्याआधी ममतांनी जखमींच्या उपचाराची माहिती घेण्यासाठी बंगालमधील पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले. अपघातावरून मी कुठले राजकारण करू इच्छित नाही. जखमींना आणि त्यांच्या कुटूंबीयांना शक्य ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ममतांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. ओडिशात नुकत्याच झालेल्या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याने संपूर्ण देश हळहळत आहे.





