सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; फडणवीस म्हणाले, आम्ही त्यांचे तत्व मान्य केले असून…

मुंबई – राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सुमारे सतरा लाखांहून अधिक कर्मचारी संपावर गेले होते. हा संप मागे घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय देवेंद्र फडणवीस
मला माध्यमांतूनच कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतल्याची माहिती मिळाली. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न आमच्या सरकारने समजून घेतले. आमच्या सरकारने कुठेही अहंकार न ठेवता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, कर्मचाऱ्यांना जे सामाजिक संरक्षण हवं आहे. त्यांना निवृत्तीनंतर जे फायदे हवे आहेत, त्यासंदर्भात जे तत्व आहे, ते आम्ही मान्य केलं आहे. याची कार्यवाही कशी करायची, यासाठी एक समिती काम करत आहे.’
आमच्या सरकारने कुठेही आडमुठी भूमिका न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यासाठी मी कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा सरकारच्या वतीने सांगू इच्छितो की, सगळे कर्मचारी आमचेच आहेत. त्यांना जे चांगल्यात चांगलं देता येईल, ते देण्याचा प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे.”
=====

