मविआच्या 160 ‘जीआर’वर राज्यपालांचा हस्तक्षेप; बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले…

मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन बंड पुकारला आहे. या बंडात अनेक मंत्रीही सहभागी आहेत. त्यामुळे सरकार कधीही कोसळणार अशी शक्यता व्यक्त होतेय. मात्र महाविकास आघाडीने कामाचा धडाका लावला आहे. सरकारने तीन दिवसांत 160 जीआर काढले. त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावरून काँग्रेसनेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात संतप्त झाले आहेत.
राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारकडून 160 जीआर संदर्भात सरकारकडे माहिती मागवली आहे. त्यावर , राज्यपालांना आताच जीआर दिसले का असा प्रश्न विचारत थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यपाल जीआरबाबत स्पष्टीकरण मागत असतील तर दुर्दैवी आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहणार आहोत. तो शेवटचा क्षण कधी येईल माहीत नाही. जीआर काढणे हा कामाचा भाग आहे. आम्हाला घटनेने अधिकार दिला आहे. लोकांच्या हिताचे निर्णय घेतले आहे, सरकार म्हणून काम करतोय. याआधी पण जीआर निघाले होते, असं थोरात यांनी म्हटलं आहे.
भाजपचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीकडून तीन दिवसांत काढण्यात आलेल्या 160 जीआरवरून तक्रार केली होती. तसेच सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्यपालांनी सरकारकडे माहिती मागवल्याचं दिसून येत आहे.





