“राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी संघ आणि भाजपची कार्यपद्धती उघडी पाडली; भाजप आता मूग गिळून गप्प का?”

जम्मू – जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल व सध्याचे मेघालयाचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सनसनाटी दावा करून संघ व भाजपची कार्यपद्धती उघडी पाडली आहे त्यावर भाजपचे केंद्र सरकार मूग गिळून का गप्प बसले आहे असा सवाल जम्मू-काश्मीर नॅशनल पॅंथर्स पार्टीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षदेवसिंह यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी म्हटले की एकेकाळी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांनी असा जाहीर दावा केला आहे की, अंबानी आणि संघाशी संबंधित एक व्यक्ती अशा दोघांच्या फायलींवर मी स्वाक्षरी केली तर मला तीनशे कोटी रुपयांची लाच दिली जाईल अशी ऑफर देण्यात आली होती. पण मी ते दोन्ही प्रस्ताव रद्द केले असे सत्यपाल मलिक यांनी जाहीरपणे नमूद केले आहे.
हर्षदेवसिंह यांनी म्हटले आहे की त्यांच्या या दाव्यावर केंद्र सरकारकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. एक मोठा व्यावसायिक आणि एक राजकीय सिंडिकेटमधील माणूस थेट राज्यपालांनाच लाच देण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे पण ते मात्र अजून मोकाट आहेत.
मलिक यांनी या प्रत्येकी दीडशे कोटी रुपयांच्या दोन फाईली नाकारल्यानंतर सत्यपाल मलिक यांना जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल पदावरून तातडीने हलवण्यात आले आहे. हे सार प्रकरण जर राज्यपालांनीच लोकांपुढे आणले असेल तर सरकारने त्यांची बाजू स्पष्ट केली पाहिजे, असे ते म्हणाले.





