राज्यपाल कोश्यारींचा सोलापूर दौरा अडचणीत; शिवप्रेमी संघटनांकडून आंदोलनाचा इशारा

सोलापूर – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत समर्थ रामदास स्वामींना शिवरायांच्या गुरुपदी बसविण्याबाबत औरंगाबादमध्ये वक्तव्य केले आहे. कोश्यारींच्या या वक्तव्यामुळे अवघ्या हिंदुस्थानातील कोट्यवधी शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यांनी घडल्या कृत्याबद्दल माफी मागावी यासाठी सोलापुरातील विविध पक्ष, संघटनांनी रस्त्यावर उतरत राज्यपालांविरुद्ध रोष व्यक्त केला आहे.
राज्यपाल 4 मार्च रोजी विवेकानंद केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. राज्यपालांच्या या दौऱ्याला शिवप्रेमींचा कडाडून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय, सर्वधर्मीय शिवप्रेमींची महत्त्वपूर्ण बैठक सोलापुरात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत 4 मार्च रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महामार्गावर सकाळी साडेदहा ते 11 या वेळेत रास्ता रोको करून राज्यपालांचा निषेध केला जाणार आहे. तर सोलापूर शहरातील आसरा चौकात हजारो मावळे रस्त्यावर उतरून राज्यपालांचा निषेध करत जाब विचारणार आहेत.
या बैठकीस शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस या राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संभाजी आरमार, संभाजी ब्रिगेड, सकल मराठा समाज, जिजाऊ ब्रिगेड, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड, लहुजी शक्ती सेना आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.





