Dhananjay Munde : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला

मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. अखेर आता राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान आता धनंजयम मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडेंवर दबाव
बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. वातावरण चांगलंच तापलं होतं. सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपावला होता. तसेच एसआयटी देखील स्थापन करण्यात आली. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी सीआयडीनं या प्रकरणात आरोप पत्र दाखल केलं होतं. या आरोप पत्रात वाल्मिक कराड हाच या घटनेचा मास्टर मांईड असल्याचे सीआयडीने म्हंटले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.
काय आहे नेमके प्रकरण?
मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी सीआयडीकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपत्रात मृत संतोष देशमुख यांची कशाप्रकारे हत्या केली याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली.





