सरकारी काम अन् तीन वर्षे थांब..!

सातारा – “सरकारी काम अन् सहा महिने थांब,’ ही प्रचलित म्हण बदलली असून “सरकारी काम आणि तीन वर्षे थांब’ असे म्हणण्याची वेळ बुधमधील ग्रामस्थांवर आली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि ठेकेदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बुध गावातील मुख्य रस्त्याचे आणि गटाराचे काम तीन वर्षांहून अधिक काळ रखडून पडले आहे.
बुध गावातील बस स्थानक ते राजवाडा व बाजारपेठ बस थांबा ते बाजार पटांगण यादरम्यानचे तब्बल 900 मीटरचे गटाराचे व रस्त्याचे काम रखडले आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी वारंवार संपर्क करूनही त्यांनीच दुर्लक्ष केल्यामुळे बुधवासीयांना खड्ड्याच्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. सरकारी दिरंगाईचा फटका या कामाला बसला असून यातील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे 15 लाख आणि अर्धवट अवस्थेतील गटारकामाचे 10 लाख असे 25 लाख रुपये रखडून पडले आहेत. राज्याच्या वित्त विभागाने जिल्ह्यातील 12 रस्त्यांच्या कामासाठी एक कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी 2019 मध्ये मंजूर केला होता. या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाने एस्टिमेटची पाहणी करून त्या कामावर गुणात्मक नियंत्रण ठेवणे आणि ती कामे पूर्ण करून घेणे असे कार्यकारी अभियंत्यांना सूचित करण्यात आले होते.
बुध गावातील बुध बस स्थानक ते राजवाडा व बाजारपेठ बस थांबा ते बाजार पटांगण या रस्त्यावरील बंदिस्त गटाराचे काम सुरू केले. मात्र, ते अपूर्णच आहे. त्याशिवाय रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अद्याप सुरूही झालेले नाही. कामासाठीची खडी दोन वर्षांपासून जागेवरच पडून आहे. ग्रामपंचायतीने पाठपुरावा करूनही ठेकेदाराने “करतो, बघतो’ असे सांगत तब्बल तीन वर्षाचा विलंब केला आहे. बुध ग्रामपंचायतीकडून या कामासंदर्भात वारंवार पाठपुरावा होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर दराडे यांनी संबंधित ठेकेदाराला तंबी दिल्यानंतर त्या ठेकेदाराने ग्रामपंचायतीसमोर मुरूम आणि खडी आणून टाकण्याचे नाटक केले. मात्र, त्यानंतर दराडे यांची तंबी सुद्धा थंड पडली आणि ठेकेदारही हात वर करून मोकळा झाला. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून त्या रस्त्यावर खडी आणि बांधकामाचे इतर साहित्य तसेच पडून आहे.
मंत्रालयातील सूचनांनतरही दुर्लक्ष कायम
ग्रामपंचायतीने मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केल्यावर अनेकदा सूचना मिळूनही कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यापलिकडे काहीच प्रगती होत नाही. यासंदर्भात कार्यकारी अभियंता शंकर दराडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झाले नाहीत. बुध गावामध्ये अनेक बंदिस्त गटारे आणि सेवा रस्त्यांची कामे झाली मात्र बस स्थानकाकडे जाणारा मुख्य वर्दळीचा रस्ताच अजूनही दुरुस्त न झाल्याने बुधवासीयांना खड्ड्यातूनच प्रवास करण्याची वेळ आली आहे. संबंधित ठेकेदाराला जाब विचारून त्याला दंड करण्याचे सोडून पीडब्ल्यूडीच्या साहेबांनीच या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने बुधवासीयांचा खड्ड्यातील प्रवासाचा वनवास संपलेला नाही.





