सरकार खुल्या बाजारात उपलब्ध करणार 25 लाख टन गहू

नवी दिल्ली – खाद्यान्नाच्या महागाईमुळे एकूणच महागाई सहा टक्क्याच्या पुढे आहे. ही महागाई कमी व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणून केंद्र सरकार मार्च 2025 पर्यंत आपल्या राखीव साठ्यातील 25 लाख टन गहू खुल्या बाजारात उपलब्ध करणार आहे.
हा गहू घाऊक व्यापार्यांना ओपन मार्केट सेल योजनेअंतर्गत उपलब्ध करण्यात येईल. राज्य सरकारच्या अन्न महामंडळाकड कार्यालयाकडून या गव्हाची उपलब्धता करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. यासाठी दर्जेदार गव्हाची किमान किंमत 2,325 रुपये प्रत्येक क्विंटल आणि कमी दर्जाच्या गव्हाची किंमत 2,300 प्रतिक्विंटल ठरविण्यात आली आहे. मात्र मार्चपर्यंत हा गहू उपलब्ध होणार असल्याचे सरकारने सांगितले असले तरी नेमकी विक्री कधीपासून सुरू होणार आहे याचे स्पष्टीकरण सरकारने जारी केलेल्या पत्रकात देण्यात आलेले नाही.
गेल्या वर्षी अन्न महामंडळाच्या माध्यमातून केंद्र सरकारने दहा लाख टन गहू उपलब्ध केला होता. यावर्षी त्यापेक्षा कितीतरी जास्त म्हणजे 25 लाख टन गहू उपलब्ध करण्यात येणार आहे. यावरून सरकार महागाई कमी करण्यासाठी किती गंभीर आहे याचा प्रत्यय येतो. सरकार तांदूळही अशाच प्रकारे विविध मार्गाने खुल्या बाजारासाठी उपलब्ध करीत आहे. त्याचबरोबर खाद्यानाच्या आयात- निर्यातीकडेही सरकारचे बारीक लक्ष असल्याचे सांगण्यात आले.





