ऊसतोड कामगार महिलांसाठी सरकार स्थापन करणार “टास्क फोर्स’

मुंबई: बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील समितीने शासनाला अहवाल सादर केला आहे. या अहवालाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी सामाजिक न्याय विभागाला ऊसतोड कामगार महामंडळ आणि संबंधित विभागांच्या सहकार्याने सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या टास्क फोर्समुळे ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्य समस्यांवर त्वरित तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णय आणि समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्याचेही आदेश दिले.
पुण्यातील धक्कादायक घटना: अर्भकांचे अवयव बाटलीत –
पुणे जिल्ह्यातील दौंड येथील गोपाळवाडी परिसरात एक मृत अर्भक आणि सात ते आठ अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूणहत्येची शक्यता समोर आली आहे. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी म्हटलं की, ही घटना गंभीर असून, त्यामागील कारणांचा शोध घेणं आवश्यक आहे. सात ते आठ अर्भकांचे अवयव बाटलीत सापडणं हे बेकायदेशीर गर्भपाताच्या मोठ्या रॅकेटचा भाग असू शकतं.
कठोर कारवाईचे निर्देश –
डॉ. गोऱ्हे यांनी दौंड परिसरातील खासगी दवाखाने, प्रसुतीगृहं, वैद्यकीय व्यावसायिक आणि दलालांची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques (PCPNDT) कायद्याच्या उल्लंघनाचा संशय व्यक्त करत, सोनोग्राफी केंद्रे आणि खासगी दवाखान्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितलं. लिंगनिदान आणि गर्भपाताच्या प्रकरणांवर तात्काळ कारवाई करण्याचेही निर्देश दिले. तसेच, सापडलेल्या अर्भकांचं शवविच्छेदन करून मृत्यूचं कारण शास्त्रीय पद्धतीने शोधण्याची सूचना त्यांनी केली.





