Nagar | शासन महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे : पालकमंत्री विखे

नगर (प्रतिनिधी) – विद्यमान सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असुन समाजातील सर्व घटकांच्या विकासाबरोबरच महिलांच्या सक्षमीकरणाला शासनाचे प्राधान्य आहे.
शासन महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असुन जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिला लाभार्थ्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यात येणार असल्याचे, प्रतिपादन महसुल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शहरातील सहकार भवन येथे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिणी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,
मनपा आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे म्हणाले, पुणे येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेच्या भव्यदिव्य अशा राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न झाला.
ऐतिहासिक अशा कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याची भावना व्यक्त करत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनामार्फत महिला केंद्रीत योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
आज एस. टी भाड्यामध्ये शासनाने महिलांना ५० टक्के सवलत दिली आहे. तसेच राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णयही शासनाने घेतला असुन शासन महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
योजनेंतर्गत युवकांना 6 हजार, 8 हजार व 10 हजार रुपये प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर दरमहा शासनाकडुन डीबीटीद्वारे थेट युवकांच्या बँक खात्यामध्ये विद्यावेतन म्हणुन जमा करण्यात येणार आहेत. सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेस शासनाने मान्यता दिली असल्याचे ते म्हणाले..





