शासनाने उद्योगांना वित्तीय सहाय्य करावे – हनुमंत गायकवाड

पुणे – टेक्नॉलॉजीचा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात उपयोग करून उत्पादन खर्च कसा कमी करता येईल. क्वॉलिटी मॅन्युफॅक्चरिंग करून कमी वेळेमध्ये जादा उत्पादन कसे करता येईल, याकडे लक्ष द्यावे. उद्योगांनी व्यवसायासाठी संशोधनावर खर्च करणे गरजेचे आहे. चेंबर आणि शासनाने एकत्रितपणे लघु व मध्यम उद्योजकांना फायदा कसा होईल यावर काम करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने उद्योगांना गरज पडल्यास वित्तीय सहाय्य करावे, असे आवाहन बीव्हीजी ग्रुपचे चेअरमन हनुमंत गायकवाड यांनी केले. हिंजवडी येथे एसएमइ चेंबर ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशनतर्फे आयोजित एसएमइ मॅन्युफॅक्चरर्स आणि एक्सपोर्टर्स समिटमध्ये ते बोलत होते.
चेंबरचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे म्हणाले की, लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करण्यासाठी केंद्राने आधुनिक व नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले पाहिजे. केंद्र आणि राज्य शासनाकडून योजना तसेच उपक्रम राबवले जात आहे. त्याचा फायदा सूक्ष्म व लघुउद्योजकांनी घ्यावा. इंडस्ट्रियल पार्क, विनाकारण कर्ज, ट्रेड्स प्लॅटफॉर्म आदी योजना राबवल्या जात आहेत. त्यांचा फायदा उद्योजकांनी घेणे गरजेचे आहे. लघु मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने लघु मध्यम उद्योजकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा या मागणीचा देखील त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
यावेळी एमएसएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सचे अभिनव कुमार यांनी लघु व मध्यम उद्योगांसाठी असलेल्या इन्शुरन्स सुविधाबद्दलची माहिती दिली.
अडथळे सोडवण्यासाठी पाठपुरावा- महेश साळुंखे
चेंबरचे संचालक महेश साळुंखे म्हणाले की, राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात पुणे शहराचा वाटा मोठा आहे. लघु व मध्यम उद्योगांनी दाखवलेली नावीन्यता, गतिशीलता भारताला जागतिक उत्पादन क्षेत्रात महासत्ता बनवण्यासाठी मदत करीत आहे. लघु मध्यम उद्योगांना सहकार्य यंत्रणा, बॅंका वित्तीय संस्था आणि इतर भागधारकांकडून आवश्यक समर्थन मिळत नाही. एसएमई राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक स्पर्धात्मक होण्यास अडथळा येत आहे. आधुनिकीकरण, विस्तारीकरणातील अडथळे, समस्या सोडवण्यासाठी चेंबर शासनाकडे सतत पाठपुरावा करीत आहेत.





