शेतकऱ्यांवर संकटाचा डोंगर; सरकारने तातडीने एकरी २० हजारांची मदत द्यावी; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई : मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट ओढावले आहे. अशा कठीण वेळी पंचनाम्याच्या प्रक्रियेत वेळ न घालवता, शेतकऱ्यांना तातडीने एकरी किमान ₹२०,००० मदत द्यावी, अशी ठाम मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
सपकाळ म्हणाले की, खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला असून, सरकारने मोफत बियाणे आणि खते देऊन त्यांना सावरण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणतीही ठोस पावले न उचलणाऱ्या महायुती सरकारवर त्यांनी सडकून टीका केली.
“फक्त पंचनामे आणि कोरडी आश्वासने देऊन काही उपयोग नाही. तातडीची आर्थिक मदत आणि कर्ज पुनर्गठनाची घोषणा तात्काळ झाली पाहिजे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
तसेच, पहिल्याच पावसात मुंबई पाण्याखाली गेल्याने त्यांनी सरकारच्या अपयशावर बोट ठेवले. “एमएमआरडीएचा अहवाल भुयारी मेट्रोसाठी मुंबई योग्य नसल्याचे स्पष्ट करतो, तरीही काही लोकांच्या हट्टासाठी हा प्रकल्प राबवण्यात आला. त्याचे दुष्परिणाम पहिल्याच पावसात दिसून आले आहेत,” असे सपकाळ यांनी सांगितले.





