GST Reforms 2.0: ‘या’ वस्तूंवरील GST पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता

नवी दिल्ली: केंद्र सरकार हस्तकला (Handicraft) वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करण्याच्या तयारीत आहे. यासाठी सरकार प्रस्ताव तयार करत असल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने काही वृत्तांमधून समोर आली आहे. यापूर्वीच्या वृत्तांनुसार, विमा क्षेत्रावरील जीएसटी देखील शून्य करण्याचा विचार आहे. नवीन माहितीनुसार, हा प्रस्ताव जीएसटी 2.0 ब्लूप्रिंटचा भाग आहे, ज्याचा उद्देश कर रचना सुलभ करणे आणि सामान्य नागरिक तसेच व्यावसायिकांवरील करभार कमी करणे आहे.
सध्याचे जीएसटी दर:
सध्या, कापडी हस्तकला वस्तूंवर ५%, धातूच्या हस्तकला वस्तूंवर १२%, आणि लाकडी हस्तकला वस्तूंवर १२-१८% जीएसटी आकारला जातो. मात्र, आता सरकार याला पूर्णपणे शून्य (GST NIL) करण्याचा प्रस्ताव तयार करत आहे.
जीएसटीमधील मोठ्या बदलाची शक्यता:
५% आणि १८% स्लॅब: सध्याचे १२% आणि २८% स्लॅब रद्द केले जाणार.
४०% विशेष दर: मद्य आणि तंबाखूसारख्या विलासी आणि हानिकारक उत्पादनांवर हा दर लागू होईल.
कोणत्या वस्तूंवर किती कर?
– अन्नपदार्थ, औषधे, वैद्यकीय उपकरणे, स्टेशनरी, शैक्षणिक साहित्य, टूथब्रश आणि केसांचे तेल यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर करमुक्त किंवा ५% स्लॅब लागू होईल.
– टेलीव्हिजन, एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या वस्तूंवर १८% स्लॅब लागू होईल.
– हिरे आणि मौल्यवान दगडांवर ०.२५%, तर दागिन्यांवर ३% दर कायम राहील.
– तंबाखू उत्पादनांवर एकूण ८८% कर लागू राहील, परंतु विशेष ४०% कर आकारला जाईल.
ऑटोमोबाइल आणि इतर क्षेत्रांवर लक्ष:
सरकारने ऑटोमोबाइल, हस्तकला, कृषी उत्पादने, कापड, खते आणि नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांवर विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे. नवीन जीएसटी रचनेमुळे नमकीन, पराठा, बन आणि केक यांसारख्या उत्पादनांवरील कर वर्गीकरणाशी संबंधित वाद संपुष्टात येतील. माहितीनुसार, या बदलांमुळे कर रचना अधिक सुलभ होईल आणि सामान्य नागरिकांना तसेच उद्योगांना दिलासा मिळेल. याबाबत अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे.





