Madhya Pradesh : मध्य प्रदेशात तर चोरांचे सरकार; राहुल गांधींची शिवराज सरकारवर टीका

Madhya Pradesh – भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे येथील तरुण बेरोजगार आहेत. शिवराज सरकार 50 टक्के कमिशन घेते. त्यावर मोदींनी कोणतीही कारवाई केली नाही. मध्य प्रदेश असे आहे जिथे मृतांवर उपचार केले जातात. व्यापमं, पटवारी, एमबीबीएस असे घोटाळे येथे झाले आहेत.
विरोधकांचे आमदार पैशाच्या जोरावर फोडणारे शिवराज यांचे सरकार चोरांचे सरकार आहे, अशा तीव्र शब्दांत कॉंग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार राहूल गांधी यांनी मध्य प्रदेश सरकारवर टीका केली.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशातील बरवानी येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी राहुल गांधींना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. राहुल यांनी आपल्या सभेत तरुणाईपासून त्यांच्या रोजगारापासून ते शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा अनेक गोष्टींवर चर्चा केली, तर आपल्या भाषणात त्यांनी आदिवासींचाही उल्लेख केला.
यावेळी राहुल यांनी कॉंग्रेसशासित राज्यांतील त्यांच्या कारभाराचे कौतुक केले आणि भाजपशासित मध्य प्रदेशातील सध्याच्या सरकारवर निशाणा साधला. राज्यात कॉंग्रेसचे सरकार आल्यास युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन राहुल यांनी मंचावरून तरुणांना दिले. आधीच्या कॉंग्रेस सरकारने शेतकरी कर्जमाफी केली. त्याउलट भाजपच्या काळात 18000 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली.
कोटेशन !
आदिवासी मुलांनी जे बनायचे आहे ते बनले पाहिजे आणि त्यांना यामध्ये पूर्ण मदत केली पाहिजे, ही कॉंग्रेसची विचारसरणी आहे. पण भाजपवाले या आदिवासी मुलांना इंग्रजी नको फक्त हिंदी शिकायला सांगतात. आम्ही हे म्हणत नाही की, हिंदी शिकू नका.
पण इंग्रजीही महत्त्वाचे आहे. कारण तुम्हाला डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे असेल, कॉल सेंटरमध्ये काम करायचे असेल, देशाबाहेर जायचे असेल, तर त्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे.
– राहूल गांधी, कॉंग्रेस नेते





