मुंबईच्या नव्या मार्गात ‘सरकारी’ अडथळे

पुणे – नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शिरुर-खेड-कर्जत असा नवीन मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावित मार्गामुळे मराठवाडा येथून मुंबईकडे जाणारी वाहतूक शिरुर-खेड मार्गे थेट कर्जतला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे आठ महिन्यांपूर्वीच सादर केला आहे. मात्र, यावर अद्याप साधी चर्चाही शासकीय पातळीवर झालेली नाही.
हा मार्ग झाल्यास मुंबईला जाण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे. वेळेची बचतही होईल. त्याचबरोबर पुणे शहरावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे, शासनाने याबाबत निर्णय घ्यावा यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत मराठवाड्यामधून येणाऱ्या वाहनांना मुंबईला जाण्यासाठी चाकण-शिक्रापूर-तळेगाव या मार्गे मुंबईला जावे लागते. चाकण आणि शिरुर येथील एमआयडीसीमुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते.
मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी सध्या एकच मार्ग आहे. त्याचा परिणाम पुणे शहरातील वाहतुकीवर होतो. नगर रस्त्यावरील ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध पर्यायांचा विचार करण्यात आला होता. त्यानुसार शिरूर मार्गे थेट कर्जत जाणाऱ्या रस्त्याचा एक पर्याय समोर आणला आहे. “मल्टिनोडल कॉरिडॉर’ म्हणून हा मार्ग ओळखला जाणार असून तो चार पदरी असेल. बांधा वापरा हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर हा मार्ग उभारता येऊ शकतो.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये…
- 135 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित
- शिरुर-राजगुरुनगर-शिरवली-पाईट-वांद्रे-कर्जत
- कर्जत मार्ग पनवेल-उरणला जोडणार
- मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग
- औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला फायदा
- 12 हजार कोटींचा खर्च अपेक्षित
- निधीसाठी बीओटीचा पर्याय





