स्वच्छ उर्जेसाठी नव्या तंत्रज्ञानांवर सरकारचा भर – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली – स्वच्छ उर्जा स्थित्यंतरासाठी सरकार लहान अणुभट्टीसारख्या नव्या तंत्रज्ञानांवर काम करत आहे, अशी माहिती आज केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरात दिली. अणुउर्जा हा उर्जा निर्मितीसाठी सर्वात आश्वासक स्वच्छ उर्जा पर्याय आहे असे ते म्हणाले.
येत्या काही वर्षात जीवाश्म इंधनावरीर अवलंबीत्व कमी करू शकणाऱ्या अणुऊर्जेचा वापर करण्याच्या धोरणावर जगभरात भर दिला जात आहे. कमी क्षमतेचे अणुउर्जा प्रकल्प ज्यांना सार्वत्रिकपणे लहान मॉड्युलर अणुभट्ट्या (एसएमआर्स) म्हणतात. त्यांच्या लघु आकार आणि मोठ्या प्रमाणातील कार्यक्षमता तसेच कमी कार्बन पदचिन्हे तसेच सुधारित सुरक्षितता या वैशिष्ट्यपूर्ण घटकांमुळे या अणुभट्ट्या कार्यनिवृत्त होत असलेल्या कोळशावर आधारित औष्णिक उर्जा उत्पादन केंद्राच्या जागांचा पुनरुपयोग करण्यासाठीचा आकर्षक पर्याय ठरतात.
देशभरात सर्वत्र, विशेषतः मोठ्या अणुभट्ट्या उभारण्यासाठी सोयीस्कर नसलेल्या ठिकाणी लहान मॉड्युलर अणुभट्ट्या (एसएमआर्स) उभारल्यास, त्यांतून कमी कार्बन उत्सर्जनासह मोठ्या प्रमाणात विद्युतनिर्मिती करता येऊ शकेल. जीवाश्म इंधन वापर टाळण्याच्या दृष्टीने, जुन्या झालेल्या जीवाश्मइंधन आधारित विद्युतनिर्मिती प्रकल्पांचा पुनरुपयोग करण्यासाठी देखील एसएमआर्सची उभारणी तसेच कार्यान्वयन करता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.





